दिवसभर पावसाची रिपरिप, चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:59 IST2020-09-22T19:58:08+5:302020-09-22T19:59:06+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारपासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. सांगरुळ (ता. करवीर) येथे जोरदार पाऊस झाला.
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.
गेली चार-पाच दिवस पावसाने उसंत घेतली होती. कडकडीत ऊन पडले होते. भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस आले आहे. आणखी दोन-तीन दिवस पाऊस थांबला असता तर काढणीस वेग आला असता. मात्र, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्यात पावसाची भुरभुर सुरू झाली. आठनंतर ती वाढत गेली.
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दुपारी काही काळ कोल्हापूर शहरात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा रिपरिप सुरू राहिली. पावसाबरोबरच हवेत गारठा जाणवत होता. या पावसाने काढणीस आलेले खरीप पीक धोक्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७.०३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ५८.५० मिली मीटर झाला. हातकणंगले १, शिरोळ ६.५७, शाहूवाडी १.५०, राधानगरी ३.१७, गगनबावडा ४, आजरा १२.५० मिली मीटर पाऊस झाला.