कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी, आज घेणार पदभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:02 IST2025-10-11T12:01:34+5:302025-10-11T12:02:17+5:30
माजी कुलगुरू डॉ.डी.टी शिर्के यांचा कार्यकाळ संपल्याने, त्याच दिवशी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, राजभवनाकडून कार्यवाही न झाल्याने विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ कुलगुरुविना राहिले.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी, आज घेणार पदभार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. राजभवन कार्यालयाकडून शुक्रवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला.
गेल्या चार दिवसांपासून कुलगुरुविना असलेल्या शिवाजी विद्यापीठाला डॉ.गोसावी यांच्या रूपाने प्रभारी कुलगुरू मिळाले आहेत. आज शनिवारी डॉ.गोसावी प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
माजी कुलगुरू डॉ.डी.टी शिर्के यांचा ६ ऑक्टोबरला कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपल्याने, त्याच दिवशी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, राजभवनाकडून कार्यवाही न झाल्याने विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ कुलगुरुविना राहिले. माजी प्र.कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांचाही कार्यकाळ ६ ऑक्टोबरलाच संपला. त्यामुळे प्रभारी कुलगुरुपद कुणाकडे जाते याची उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी राजभवनाने ही प्रतीक्षा संपवली.
डॉ.गोसावी हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. जून २०२३ मध्ये त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. डॉ.गोसावी मूळचे जळगांवचे आहेत. पुणे विद्यापीठात उच्चशिक्षण घेतले. याच विद्यापीठात प्राध्यापक ते कुलगुरुपदापर्यंत त्यांनी मजल मारली.
शिवाजी विद्यापीठाचा गौरवशाली वारसा (परंपरा) वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. - डॉ.सुरेश गोसावी (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)