Kolhapur: वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:46 IST2025-07-29T15:44:16+5:302025-07-29T15:46:00+5:30
डॉ. शिर्के यांनी यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे

Kolhapur: वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश आज विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाला.
डॉ. शिर्के हे शिवाजी विद्यापीठातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पदाची कर्तव्ये सांभाळून वारणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. त्यानंतर ते वारणा विद्यापीठाचे पूर्णवेळ प्रथम कुलगुरू होतील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यापूर्वी सातारा येथे नव्याने स्थापित कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
मातृसंस्थेसाठी काम करण्याची संधी: डॉ. शिर्के
वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझे पदवी स्तरावरील प्रथम वर्षाचे शिक्षण हे याच संस्थेमध्ये झाले आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या मातृसंस्थेतील सेवा समाधानपूर्वक पूर्ण करीत असतानाच ही नवी संधी प्राप्त झाल्याने या मातृसंस्थेसाठीही काम करता येणार आहे, याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.