चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:48 IST2025-10-28T12:47:36+5:302025-10-28T12:48:11+5:30
आता तीन महिने आमचा तुम्हाला त्रास नाही

चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली
कोल्हापूर : शेंडा पार्कमधील कार्यक्रमामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुखी आणि समाधानी आयुष्याची गुरूकिल्लीच उपस्थितांना सांगितली. जरी त्यांनी भय्या माने यांचे नाव घेऊन सूचना केली, तरी ती सर्वांसाठीच लागू असल्याने टाळ्यांचा कडकडाट करत उपस्थितांनीही मुश्रीफ यांना दाद दिली.
या सगळ्याची सुरुवात डॉ. अजित लोकरे यांनी केली. ते म्हणाले, मी गेल्या दोन महिन्यांत मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत काम करताना कुठं बेरीज करायची आणि कुठं वजाबाकी करायची हे शिकलो. त्यांच्या कामाचे वेळापत्रक सांगून हा माणूस सकाळी सातलासुद्धा ज्या पद्धतीने समोरच्याशी बोलतो तसेच संध्याकाळी सातलासुद्धा बोलत असतो असे सांगितले.
याला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, मी राजकारण आणि समाजकारणात तळमळ महत्त्वाची मानतो. लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी वेळ देणारा, त्यांचे प्रश्न मांडणारा, त्यासाठी भांडणारा नसेल तर सामान्यांचे हित होत नाही. हे समोर ठेवून मी गेली ३० वर्षे कार्यरत आहे. मी भय्या माने यांनाही हेच सांगतो की चिडायचं नाही. आपलं बीपी वाढतंय. डोक्यावर बर्फ ठेवायचा. कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाकडनं काही अपेक्षा ठेवायची नाही. मग रात्री लगेच झोप लागते. मुश्रीफ यांचा हा सल्ला मात्र अनेकांना पटल्याचे त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून यावेळी दिसून आले.
सीपीआरला नवीन अधिष्ठाता
सीपीआरच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी दोन महिने सांभाळतो असे सांगून डॉ. अजित लोकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यांची मुदत संपल्याने आता लवकरच सीपीआरला नवीन अधिष्ठाता देणार असल्याचेही याच कार्यक्रमात मुश्रीफ यांनी सांगून टाकले.
आता तीन महिने आमचा तुम्हाला त्रास नाही
आता विविध निवडणुकांच्या आचारसंहिता लागणार आहेत. त्यामुळे तीन महिने आमचा तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु, तीन महिन्यांत सीपीआरचे नूतनीकरणाचे चांगले काम वेळेत पूर्ण करा, अशी सूचना मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांना केली.