‘सावित्रीबाई फुले’तील डॉक्टर झाले गायब

By Admin | Updated: April 10, 2015 01:03 IST2015-04-10T00:50:04+5:302015-04-10T01:03:39+5:30

रुग्णांची हेळसांड : आठपैकी एकच डॉक्टर उपस्थित; दररोज ३०० रुग्णांची हेळसांड; कारभार आलबेल

The doctors of Savitribai Phule were missing | ‘सावित्रीबाई फुले’तील डॉक्टर झाले गायब

‘सावित्रीबाई फुले’तील डॉक्टर झाले गायब

संतोष पाटील - कोल्हापूर--  महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी अघोषित सुटी घेतली. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टरांची वाट पाहणाऱ्या रुग्णांना अकरा वाजेपर्यंत डॉक्टर न आल्याने निराश होऊन परतावे लागले. येथील आठ डॉक्टरांपैकी फक्त एकाच डॉक्टरना रुग्णालयात येण्यास वेळ मिळाला. डॉक्टरांच्या मनमानीपणाबद्दल महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने दररोज ३०० हून अधिक बाह्यरुग्णांची हेळसांड होत आहे. महापालिकेच्या शहरातील आरोग्य केंद्रांत पुरेसे वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, रुग्णालयातून गायब होणाऱ्या डॉक्टरांमुळे वैद्यकीय सेवेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
सावित्रीबाई फुले रुग्णालयात आठ डॉक्टरांची नेमणूक आहे. मात्र, एकही डॉक्टर वेळेत हजर राहत नाहीत, अशी येथील रुग्णांची तक्रार असते. नेहमीप्रमाणे येथील सेवा बजाविणाऱ्या डॉक्टरांपैकी फक्त एकच डॉक्टर रुग्णालयात आले. सुपरिंटेंडेंटनी ‘मुंबईहून रात्री उशिरा आल्याने कामावर येत नसल्या’चा निरोप धाडला, तर उर्वरित डॉक्टरांनी रुग्णालयाकडे पाठ फिरविली. सकाळी आठ वाजल्यापासून गरीब व गरजू रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. अकराच्या सुमारास एका क्षयरुग्णाला इंजेक्शनमुळे चक्कर आली. हडबडलेल्या यंत्रणेने दुसरीकडून एका डॉक्टरना बोलावून जुजबी उपचार केले.
बहुतांश डॉक्टर अकरा वाजल्यानंतरच रुग्णालयात येतात. कसेतरी तासभर थांबून गायब होतात. सकाळपासून येथे बाह्यरुग्णांचा राबता असतो. मात्र, डॉक्टर जाग्यावर नसल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. डॉक्टरांची तपासणी झाल्याखेरीज पुढील हालचाल करता येत नसल्याने रुग्णांसह परिचारिका व इतर कर्मचारीही हाताची घडी घालून बसतात. रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार करूनही वरिष्ठ स्तरावरून दखल घेतली जात नसल्याने तक्रारींचे प्रमाणही अत्यल्प आहे.


प्रशासनाला आव्हान
महापालिकेतर्फे शहरातील नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन हॉस्पिटल अशी तीन मोठी, तर २५ लहान आरोग्य कें दे्र सेवेत आहेत. यामध्ये विविध पदांवर दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे; तर ३० हून अधिक डॉक्टर सेवेत आहेत. सर्व रुग्णालयांसह आरोग्य केंद्रांतून तब्बल पाचशेहून अधिक रुग्णांना लाभ होतो. रुग्णसेवा जलद व
दर्जेदार होण्यासाठी मानसेवी डॉक्टर
नेमण्याची घोषणा प्रशासनाने केली; मात्र, मानसेवी राहू देत, आहेत ते डॉक्टरसुद्धा रुग्णालयाकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे. डॉक्टरांनी थेट प्रशासनालाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.


महिन्याला सहाशे ते सातशे सोनोग्राफी व इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी बाहेरील दोन ते तीन मोजक्या ठिकाणांच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. येथे यंत्रणा असूनही या चाचण्या घेण्याचे टाळले जाते.
गर्भवती महिलांना थायरॉईड व अनेक वेळा सोनोग्राफीसारख्या चाचण्या कारण नसताना करणे भाग पाडले जाते. असे अनेक अवैध प्रकार महापालिकेच्या रुग्णालयात सुरू आहेत.
आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून रुग्णालयांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


रुग्णालयातील दोन डॉक्टर ट्रेनिंगवर आहेत. एक महिला आयोगापुढे साक्ष देण्यासाठी मुंबईला गेले. दोन डॉक्टर रजेवर आहेत. असे असले तरी येथील रुग्णसेवेवर परिणाम न होण्याची काळजी घेतली आहे.
- डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी

Web Title: The doctors of Savitribai Phule were missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.