* चिपरी येथे महामार्गालगत भटकंती करणाऱ्यांचे राबताहेत हात
घन:शाम कुंभार
यड्राव : लॉकडाऊनपासून अनेक समस्यांना तोंड देत शेतीपूरक वस्तुनिर्मितीचे काम सुरू आहे. पोलाद व कोळसा दरवाढीचा फटका बसत असल्याने निर्माण केलेल्या वस्तूंकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत. अशातच पोट भरणे मुश्कील बनले आहे. आमचे रेशनकार्ड मध्यप्रदेशचे आहे. त्यावर आम्हाला रेशन देता का? मिळाले तर उपकार होतील! अशी आर्त मागणी करून मध्यप्रदेशच्या भटकंती करणाऱ्या लोहार कारागीरांनी व्यथा मांडल्या.
कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावरील चिपरी येथे स्टार पेट्रोल पंपाजवळ मध्यप्रदेशमधील भोपाळ जिल्ह्यातील शैतानसिंग लोहार, कुलसिंग लोहार, रामसिंग लोहार, नानुसिंग लोहार, पप्पूसिंग लोहार या कुटुंबप्रमुखासह प्रत्येकी सहाजणांच्या परिवाराने येथे तंबू ठोकला आहे. याठिकाणी ते पोलादपासून कुऱ्हाड, कोयता, कुदळ, टिकाव यासारख्या शेती उपयोगी वस्तुनिर्मिती करत आहेत. लॉकडाऊनच्या आधी पोलाद ३० रुपये किलो होता. आता ४५ रुपये किलो झाला आहे. कोळसा १७ रु किलो होता तो आता २२ रुपये किलो झाला आहे त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्याने ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी निर्माण केलेल्या साहित्याचा खप होईल तितके दिवस त्यांचा मुक्काम राहतो. त्यानंतर पुन्हा पुढील गावी जावे लागते.
गावी शेती नाही यामुळे भटकंती करत संसार चालवावा लागतो. डोक्यावर आभाळाची सावली, झोपण्यासाठी धरतीचा आधार, हे आमच्या पाचवीलाच पुजले आहे. यामुळे जन्मलेल्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत उन्हा-तान्हात, थंडीत राबावे लागते. लेकराबाळांच्या मदतीने ऐरणीवर घण घालून पोट भरण्यासाठी घाम गाळावा लागतो.
शासन गोरगरिबांसाठी अनेक उपाययोजना करते. आमचे रेशनकार्ड मध्यप्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील आहे. त्यावर आम्हाला रेशन मिळाले तर बरं होईल! दोन घास पोटात जातील, उपकार होतील अशी आर्त मागणी करून भटकंती करताना आलेल्या समस्यांचा पाढाच वाचला .
फोटो - १४१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळी - चिपरी (ता. शिरोळ) येथे महामार्गालगत मध्यप्रदेश मधील लोहार परिवार तान्हुल्यासह उन्हातानात शेती उपयोगी साहित्य निर्माण करताना. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)