Do not name Shivaji University: n. D. Opinion of Shivprami, a history researcher with Patil | शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच :एन. डी. पाटील
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच :एन. डी. पाटील

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोचइतिहास संशोधक, शिवप्रेमींचे मत, निष्कारण वादविवाद नको

कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण फार विचारपूर्वक करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे नाव रूढ झाले आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख लघुरूपातच (शॉर्ट फॉर्म) होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार नकोच, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह इतिहास संशोधक, शिवप्रेमींनी व्यक्त केले.

या विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना शनिवारी (दि. ७) केली आहे. त्याबाबत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, या विद्यापीठाची स्थापना होताना त्याचे नामकरण ‘शिवाजी विद्यापीठ’ असे करण्यापूर्वी फार चर्चा आणि विचार करण्यात आला. त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विद्यापीठाच्या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख असावा, असे आमचे मत होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा केली.

त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण करण्यामागील भूमिका स्पष्ट केली, ती योग्य वाटल्याने आम्ही विरोध टाळून त्यांना सहकार्य केले. आता नामकरण झाल्यास आरपीसी (बेळगावचे राणी पार्वतीदेवी कॉलेज), मुंबईतील सीएसटी, व्ही. टी. बडोद्याची एम. एस. युनिव्हर्सिटी, आदींप्रमाणे या विद्यापीठाचादेखील लघुरूपातच उल्लेख होण्याचा, मूळ नाव बाजूला पडण्याचा धोका आहे; त्यामुळे नामविस्ताराची मागणी, त्याबाबतची नवीन चर्चा करणाऱ्यांनी जरा दमाने घ्यावे. नामकरणाचा इतिहास समजून घ्यावा. नामविस्तार करू नये.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, या विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत सध्या जे नव्याने सुरू झाले आहे ते बरोबर नाही. नामसंकोच होऊ नये म्हणून स्थापनेवेळी सर्वांकष चर्चा करूनच नामकरण केले होते. नामविस्तार झाल्यास नावाचा उल्लेख संक्षिप्त स्वरूपात होणार आहे. अनेक इतिहासकार, महापुरुषांचा त्यांच्या पहिल्या नावाने उल्लेख होतो. याचा अर्थ त्यांच्याबद्दल आदर नसणे असा होत नाही. त्यामुळे विद्यापीठाचा नामविस्तार करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही.

विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत म्हणाले, विचार करूनच स्थापनेवेळी विद्यापीठाचे नामकरण केले आहे. त्यामुळे आता नामविस्तार करणे योग्य ठरणार नाही. सध्याचेच नाव योग्य आहे. विद्यापीठातील निवृत्त अभियंता रमेश पोवार म्हणाले, बॅरिस्टर पी. जी. पाटील यांनी अनेकदा त्यांच्या भाषणातून विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहास सांगितला आहे. विचारपूर्वक ठेवलेल्या नावाचा विस्तार करण्यात येऊ नये.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, महापुरुषांच्या बिरुदावलीसह शैक्षणिक अथवा सामाजिक संस्था, इमारतींना नाव दिल्यास त्याचा उल्लेख लघुरूपातच झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. मात्र, ‘शिवाजी विद्यापीठा’बाबत हे झालेले नाही. जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख ‘शिवाजी’ या नावानेच आहे. याचा अर्थ त्यांच्याबद्दल आदर नाही, असा होत नाही. नामविस्ताराऐवजी विद्यापीठात शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती देणारे उपक्रम राबवावेत. ‘पुरातत्त्व’विषयी अभ्यासक्रम सुरू करावेत.

मुख्यमंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडणार

या विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच नामकरणाचा विषय संपुष्टात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मंत्रिमंडळाने सर्वांगीण विचार करून नावाबाबत एकमुखी निर्णय घेतला. अशी वस्तुस्थिती असताना आता नव्याने नामविस्ताराचा मुद्दा पुढे आला आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहोत. ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नाव कायम ठेवण्याची मागणी करणार आहोत. या प्रश्नी कोणीही भावनिक होऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

‘श्री शिवाजी मेमोरियल’ असा उल्लेख

गेल्या आठवड्यात खासदार संभाजीराजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा नामविस्तार करण्याची मागणी केली होती. मात्र, खासदार संभाजीराजे कार्यरत असणाºया पुणे येथील एका संस्थेचे नाव ‘आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ असेच आहे.
 

Web Title:  Do not name Shivaji University: n. D. Opinion of Shivprami, a history researcher with Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.