जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात भात ओतल
By Admin | Updated: December 5, 2014 23:31 IST2014-12-05T23:05:14+5:302014-12-05T23:31:05+5:30
‘स्वाभिमानी’चे आंदोलन : भात खरेदी केंद्रप्रश्नी प्रशासनाचा निषेध; जोरदार निदर्शने, ठोस आश्वासनानंतरच माघारे

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात भात ओतल
कोल्हापूर : शासनातर्फे भात खरेदी केंद्रे सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलिसी बळाला झुगारून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात भाताची पोती ओतून जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेऊन ओतलेल्या भातावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. उद्या, शनिवारपासून शाहूवाडी तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी चार वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आदी तालुक्यांत भात पीक अधिक आहे. सध्या शेतकरी भाताची विक्री करत आहेत. परंतु, व्यापारी भाताची आधारभूत किंमत १३६० असताना ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे यापूर्वी वेळोवेळी संघटनेने बैठका घेऊन भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत राहिला. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी दुपारी एक वाजता भाताचे दोन टेम्पो ट्रॅक्स घेऊन दाखल झाले. याचा सुगावा लागताच पोलिसांनी कडे करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, टेम्पो ट्रॅक्समधील चार ते पाच पोती खांद्यावर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर घुसले. मात्र, विरोधाला न जुमानता कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कक्षाच्या दारातच भात ओतले.
‘जिल्हा प्रशासनाचा निषेध असो’, ‘खासदार राजू शेट्टींचा विजय असो’, ‘भात खरेदी केंद्र सुरू झालेच पाहिजे’ अशा घोषणा देऊन लक्ष वेधले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोरील दरवाजा बंद केले. दरवाजासमोर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. तडजोड करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या कक्षात येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे मार्केटिंग अधिकारी एम. एम. पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे राज्य संचालक संदीप नरके यांच्या उपस्थितीत ‘स्वभिमानी’च्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली.
चर्चेवेळी ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी व शेतकरी यांनी भात खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. गेल्यावर्षी शाहूवाडी तालुक्यातील केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी घेतलेल्या गोडावूनचे भाडे अद्याप मिळाले नसल्याचे भगवान काटे यांनी निदर्शनास आणले. भात खरेदी केंद्र सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. प्रा. जालंदर पाटील यांनी प्रशासनाची चांगली कानउघाडणी केली. उद्यापासून भात खरेदी केंद्र सुरू करण्याच्या ठोस आश्वासनानंतरच कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात अनिल मादनाईक, सागर शंभूशेट्टी, अमर पाटील, प्रमोद कदम, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
भात भरून दिले..
ओतलेल्या भातासह घेऊन आलेले भाताचे दोन टेम्पो घ्यावेत, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे धरला. तडतोड झाल्यामुळे प्रशासनातर्फेच ओतलेले भात भरून देण्यात आले.
आत्महत्या करायला लावू नका...
एकीकडे पिकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. आम्ही अनेक अडचणीवर मात करत भात पिकवला आहे. मात्र, आधारभूत किमतीनेही खरेदी करण्यास दिरंगाई होत असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असे वसंत पाटील यांनी प्रशासनाला सांगितले.