जिल्हा बॅँकेची गाडी रुळावर
By Admin | Updated: July 9, 2014 01:03 IST2014-07-09T00:47:38+5:302014-07-09T01:03:32+5:30
आर्थिक अडचणीतून बाहेर : लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग; ठेवी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा

जिल्हा बॅँकेची गाडी रुळावर
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) अडचणीतून बाहेर पडली आहे. नाबार्ड नियुक्त सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखापरीक्षणात बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला असून, नागरी बँकांसह सहकारी संस्थांच्या ठेवी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. बँकेला तब्बल नऊ वर्षांनी ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
बँकेवर नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रशासक आले. आतापर्यंत बँकेचे तीन प्रशासक झाले. धनंजय डोईफोडे, उत्तम इंदलकर व सध्याचे प्रतापसिंह चव्हाण या तिघांनीही आपल्या पद्धतीने बँक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वसुलीबरोबर ठेवी वाढविण्याकडे प्रशासकांनी लक्ष केंद्रित केले होते, पण बँकेच्या एन.पी.ए.मुळे बँक सेक्शन ११(१) मधून बाहेर येणे कठीण होते. रिझर्व्ह बँकेने भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) सुधारण्याची मार्च २०१२ ची डेडलाईन दिली होती. प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी अत्यंत कुशलतेने एन.पी.ए. खाली आणत ‘सीआरएआर’प्लस केला. मार्च २०१२ ला +१.३५ टक्के ‘सीआरएआर’ करत ठेवीमधील अपरक्षण (इरोजन) ‘०’ टक्क्यांवर आणून बँकेला ११(१) मधून बाहेर काढली, पण बँकेचा परवाना कायम ठेवण्यासाठी ‘सीआरएआर’ ४ टक्क्यांपेक्षा अधिक करणे गरजेचे होते. यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात त्यांनी विशेष प्रयत्न केले. बँकेचा एन.पी.ए. ५.४० टक्के करून परवाना शाबूत राखला. २०१३-१४ या आर्थिक वर्षात बॅँकेला ‘अ’ वर्ग मिळाल्याने बँकेसमोरील मोठ्या अडचणी दूर झाल्या. ‘नाबार्ड’च्या निकषांनुसार बँकांना १०० गुणांपैकी किमान ७५ गुण पडले तरच ‘अ’ वर्ग दिला जातो. (प्रतिनिधी)