पोपट पवारकोल्हापूर : तिघांनी मिळून मैदान मारायचं हे आधीच ठरलं.. जाहीर व्यासपीठांवरून तशा घोषणाही नेत्यांनी केल्या. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा मात्र, आम्ही कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये निवडणुकीआधीच खडाखडी सुरू झाली आहे. भाजप व शिंदेसेनेने थेट जागांवरच दावा सांगितल्याने मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाची गोची झाली आहे. त्यामुळे २० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला तुम्ही विसरता कसे असा उद्विग्न सवाल करण्याची वेळ या पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आली.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदा जाहीर केले. पुढे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचीच री ओढत महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचा नारा दिला. मात्र, जागा वाटपात कुणाला किती जागा मिळणार याची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने कार्यकर्त्यांसोबत नेतेही अस्वस्थ झाले आहेत. यातूनच जागांवर दावा सांगण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. एकीने मैदानात उतरण्याआधीच महायुतीत जागांवरून ‘तू तू मै मै’ सुरू झाल्याने महायुती आकाराला येणार का याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार २८ जागांवरच चर्चामागील निवडणुकीत ज्या पक्षाने जितक्या जागा जिंकल्या आहेत त्या सोडून इतर जागांवरच चर्चा होईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. भाजप-ताराराणीला मागील निवडणुकीत ३४, राष्ट्रवादीला १५ तर शिवसेनेला ४ जागांवर गुलाल लागला होता. म्हणजे ८१ पैकी ५३ जागा निश्चित होताना उर्वरित २८ जागांवरच महायुतीत जागा वाटप होणार आहे. या २८ मध्येही १५ जागांवर भाजप आग्रही आहे. त्यामुळे शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाची हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागांवर बोळवण होणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.
भाजपचे खासदार व शिंदेसेनेच्या आमदारांनी ८० जागांचे वाटप आधीच केले आहे. मग आम्हाला ते काही जागा ठेवणार आहेत की नाही. गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी महापालिकेत सत्तेत आहे. कासवगतीने सत्तेपर्यंत कसे जायचे, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर तोडगा काढू. मात्र, त्या दोन्ही पक्षांनाच शहरात त्यांची ताकद जास्त वाटत असेल, तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल. -हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री
भाजप-ताराराणीने जिंकलेल्या ३४, राष्ट्रवादीच्या १४ आणि शिंदेसेनेच्या ४ जागा या त्या त्या पक्षाकडे राहतील. उर्वरित २९ जागांवरच वाटणी होणार आहे. यामध्येही जिंकलेल्या जागांच्या प्रमाणानुसारच वाटणी व्हावी, ही आमची मागणी आहे. शेवटी महायुती म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे जागांचा निर्णय एकत्रित बसूनच घेऊ. - धनंजय महाडिक, राज्यसभा सदस्य
शहरात शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेला पेठांमध्ये ५० हजारांवर मताधिक्य आहे. मात्र, महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढताना तिन्ही पक्षांनी जागावाटपांमध्ये एक पाऊल मागे यायला हवे. हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जागावाटपाबाबत संयमाने घ्यायला हवे. आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवू. - राजेश क्षीरसागर, आमदार
Web Summary : Pre-election discord plagues Kolhapur's Mahayuti as BJP and Shinde Sena vie for dominance, leaving NCP in a bind. Seat allocation disputes threaten the alliance's stability, raising questions about its future.
Web Summary : कोल्हापुर में चुनाव से पहले महायुति में कलह, भाजपा और शिंदे सेना के बीच वर्चस्व की जंग, एनसीपी पशोपेश में। सीट बंटवारे के विवाद से गठबंधन की स्थिरता खतरे में, भविष्य पर सवाल।