आमच्या गल्लीतून जायचे नाही, कोल्हापुरात दोन गटात वाद; शववाहिकेवर केली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:14 IST2025-11-05T12:11:59+5:302025-11-05T12:14:34+5:30
काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्याने तणाव निवळला

आमच्या गल्लीतून जायचे नाही, कोल्हापुरात दोन गटात वाद; शववाहिकेवर केली दगडफेक
कोल्हापूर : यादव नगरातील भारत बेकरीजवळ आमच्या गल्लीतून शववाहिका घेऊन जायचे नाही, असे म्हणत काही जणांनी शववाहिकेवर दगडफेक केली. मृताच्या नातेवाईकांनी शववाहिका रस्त्यातच थांबवून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्याने तणाव निवळला हा प्रकार मंगळवारी रात्री घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यादव नगरातील भारत बेकरी जवळ दोन गल्ल्यांमध्ये शववाहीका घेऊन जाण्याच्या मार्गावरून वाद आहे. यापूर्वीही तीन ते चार वेळा शववाहिका नेण्याच्या मार्गावरून दोन गल्ल्यांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी या परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले.
रात्री साडेसातच्या सुमारास शववाहिका घेऊन जाताना गल्लीतील काही नागरिकांनी विरोध केला. फिरून दुसऱ्या गल्लीतून पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले. यातच शववाहिकेवर दगडफेक झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.