दिवसभर हुलकावणी, संध्याकाळी जोरदार तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:50 IST2020-09-10T19:48:36+5:302020-09-10T19:50:46+5:30
दिवसभराच्या हुलकावणीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर पाहून मंगळवारी (दि. ८) ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.

दिवसभर हुलकावणी, संध्याकाळी जोरदार तडाखा
कोल्हापूर : दिवसभराच्या हुलकावणीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर पाहून मंगळवारी (दि. ८) ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.
सव्वासातच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने आगमन केले. तत्पूर्वी आभाळ भरून आल्याने मोठा पाऊस येईल, या भीतीने अनेकांनी लवकर घर गाठणे पसंत केले.
सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस ढगफुटीसदृश पावसाने थरकाप उडविल्यानंतर बुधवारी (दि. ९) आजरा, राधानगरी, भुदरगड वगळता जिल्ह्यात विश्रांती घेतली. गुरुवारी सकाळपासूनच आभाळ भरून आले होते.
दुपारनंतर ते निवळल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता; पण संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार (दि. १३)पासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारी आजऱ्यात ३३, राधानगरीत १७, भुदरगडमध्ये १२ मि.मी. पाऊस झाला आहे.
गगनबावडा, शाहूवाडीमध्ये किरकोळ सरी पडल्या आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी मात्र पन्हाळा, करवीर, कागल या तालुक्यांत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. या पावसाच्या भीतीतून अजूनही लोक सावरलेले नाहीत.
गुरुवारी सकाळी पुन्हा पावसाचे वातावरण झाल्याने अनेकांच्या छातीत धस्स झाले. दिवसभर आभाळ भरून आल्यासारखेच वातावरण होते; पण पाऊस मात्र झाला नाही. संध्याकाळपर्यंत तरी लोक पावसापासून सुटका झाल्याच्या समाधानात राहिले; पण सातनंतर जोरदार तडाखा सुरू झाल्याने पुन्हा एकदा भीती दाटून राहिली.
पुन्हा पावसाचा अंदाज
हवामान खात्याने शुक्रवारपासूनच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. रविवारपासून कोल्हापुरात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.