मुरगूडच्या आठवडी बाजाराला शिस्त हवी
By Admin | Updated: December 10, 2015 01:04 IST2015-12-09T21:27:15+5:302015-12-10T01:04:05+5:30
मंगळवारी तोबा गर्दी : आठवड्यातून दोनवेळा भरवण्याची मागणी

मुरगूडच्या आठवडी बाजाराला शिस्त हवी
अनिल पाटील-- मुरगूड --सीमाभागातील मोठा बाजार म्हणून ओळख असणाऱ्या मुरगूड शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला व्यापाऱ्यासह परिसरातील ग्रामस्थांचीही तोबा गर्दी असते. या गर्दीवर उपाय म्हणून आठवड्यातून दोनवेळा शहरामध्ये बाजार भरवणे हितावह आहे. याबाबत काही नागरिक व व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची मागणीही केली आहे. जर दोनवेळा बाजार भरवला तर अगदी शिस्तबद्ध दुकानांची मांडणी करता येईल. तसेच होणाऱ्या लहान-मोठ्या ट्रॅफिक जाम, आदी समस्याही दूर होतील व पालिकेसही याचा फायदा होईल.मुरगूडची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांनी मुरगूड येथे श्रीमंत पिराजीराव घाटगे कागलकर यांच्याकडून बाजारपेठ नियोजित बसवून घेत १९२५ ते ३० या काळात शिस्तबद्ध बाजारपेठेची उभारणी केली गेली. या अगोदर गावभागामध्ये मारुती मंदिर ते चावडीपर्यंत बाजार भरत होता. या वेळेचा बाजार हा किरकोळ होता; पण शहरात नवीन बाजारपेठ विकसित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वांत मोठा जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये सुरू झाला. त्यानंतर हळूहळू मंगळवारच्या आठवडी बाजाराला तोबा गर्दी उसळू लागली. यावर उपाय म्हणून सध्याचा मुरगूड विद्यालयाच्या दारातच भरणारा कोंबडी बाजार, बकरी बाजार पोलीस ठाण्यासमोरील रिकाम्या जागेत भरवावा, बाजारामधील व्यापाऱ्यांचे नियोजन करून बाजाराची जागा वाढवत पोलीस ठाण्यापर्यंत न्यावी. तसेच मिरची बाजार लोकवस्तीमधून हलवून मरगूबाई पाणंदीमध्ये बसवणे गरजेचे आहे.सर्व बाजारपेठ मुख्य रस्त्यावर आणणे गरजेचे आहे. दोन्ही बाजंूचे जोड रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवल्यास वाहने लावण्यास जागा मिळेल. यामुळे बाजाराची लांबी वाढून ग्राहकांना फिरणे सोयीचे होईल. परिणामी, गैरप्रकाराला आळा बसेल.
बाजारामधील गर्दी पाहता दोनवेळा बाजार भरवणे हिताचेच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही फायदा होईल आणि पालिकेचे उत्पन्नही वाढेल. याबाबत शहरातील प्रमुख व्यापारी, अधिकारी आदींबरोबर चर्चा करून आपण निर्णय घेऊ.
- प्रवीणसिंह पाटील, सभागृह नेता,
मुरगूड नगरपालिका.
विस्कळीतपणा : चोरट्यांकडून फायदा
सध्या पोलीस ठाण्यापासून जुना नाका इथपर्यंत नव्या बाजारपेठेमध्येच मंगळवारचा आठवडी बाजार भरतो. परंतु, या बाजाराचे निरीक्षण केल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी कोणत्या वस्तू कोणत्या क्षेत्रात विकाव्यात, याचे नियोजन जरूरीचे आहे. सध्या बाजारामध्ये विक्रेते किती आहे, याची मोजदाद करून त्यांची बसण्याची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये व्यापारी लोक ऊन, पावसाच्या संरक्षणासाठी पाली मारतात. त्यासाठी वापरलेल्या दोऱ्या, काठ्या अस्ताव्यस्त बांधलेल्या असतात. यास्तव नागरिकांना बाजारात पायी ये-जा करणेसुद्धा जिकिरीचे बनले आहे. या अस्ताव्यस्त पसरलेल्या दोरीमध्ये अडकून लहान-मोठे अपघातही घडले आहेत. नेमक्या याच दाटीवाटीचा फायदा घेत चोरटे मोबाईल, पैसे, दागिने यावर डल्ला मारत आहेत.