Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत गुलाल लावणाऱ्या जागांवरच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:39 IST2025-12-20T17:53:12+5:302025-12-20T18:39:45+5:30
कुणाला किती जागा यापेक्षा प्रभागनिहाय जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा

संग्रहित छाया
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या अद्यापही सुरूच असून शुक्रवारी काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कुणाला किती जागा यापेक्षा प्रभागनिहाय जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा करण्यात आली. जागा कोणत्या पक्षाला द्यायची यापेक्षा त्या जागेवर कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो हाच निकष या बैठकीत ठरवण्यात आला आहे. त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे.
कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शेकापसह डाव्या पक्षांनी आधीच एकीची हाक दिली आहे. उद्धवसेना व राष्ट्रवादीने त्यांच्या जागांची अपेक्षा काँग्रेसला कळवली आहे. त्यानुसार शुक्रवारी या तिन्ही प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात उद्धवसेना व राष्ट्रवादीने मागितलेल्या किती जागांवर गुलाल लागू शकतो यावर प्रामुख्याने चर्चा झाली. ज्या जागा शंभर टक्के जिंकता येतील अशा जागांवर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे.
डाव्या पक्षांशी संवाद
महाविकास आघाडीत शेकापसह डावे पक्ष व आपचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीत त्यांना किती जागा हव्या आहेत यावर आज शनिवारी चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेनंतर महाविकास आघाडीचा अंतिम फाॅर्म्युला ठरवला जाणार आहे.