'जिल्हा बँक मुश्रीफांकडे आहे म्हणून का?, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या टिप्पणीची कोल्हापूर जिल्हयात रंगली 'चर्चा'; असं का म्हणाले.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:42 IST2025-08-25T13:42:32+5:302025-08-25T13:42:56+5:30

निवडणूक आली म्हणून नव्हे !

Discussion in the district over Minister Chandrakant Patil comments on Kolhapur District Bank deposits | 'जिल्हा बँक मुश्रीफांकडे आहे म्हणून का?, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या टिप्पणीची कोल्हापूर जिल्हयात रंगली 'चर्चा'; असं का म्हणाले.. वाचा

'जिल्हा बँक मुश्रीफांकडे आहे म्हणून का?, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या टिप्पणीची कोल्हापूर जिल्हयात रंगली 'चर्चा'; असं का म्हणाले.. वाचा

गडहिंग्लज: ३२०० कोटी ठेवींच्या जनसेवा बँकेचे अध्यक्षपद हिरेमठ यांच्याकडे आहे. केडीसीसी वगळता आपल्या जिल्ह्यातील सगळ्या बँकाच्या मिळून तेवढ्या ठेवी नाहीत. केडीसीसीच्या ७००० कोटींच्या ठेवी असतील, हे बरोबर आहे ना? असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वातीताईंना केला. यावर स्वातीताईंनी माहिती नाही असे सांगितले. राजकारणी लोकांना सगळं  माहिती पाहिजे. 'बँक' मुश्रीफांकडेकडे आहे म्हणून माहिती नाही का? अशी मंत्री पाटील यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्हयात रंगली.

येथील माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतिदिनी विद्या प्रसारक मंडळातर्फे 'बसर्गे'चे सुपुत्र डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना 'डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार' प्रदानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. स्वत:च्या शारीरिक व्यंगाचा सूड न उगवता डॉ. राजेंद्र तथा राजू हिरेमठ स्वकर्तृत्वाने उभे राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा सर्वसामान्य माणसांबरोबरच समाजाच्या, राष्ट्राच्या विकासासाठी उपयोग केला, असे गौरवोद्गार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काढले.

पाटील म्हणाले, ‘सीओईपी’चे भाऊ इन्स्टिट्यूट, जनसेवा बँक व शासनाच्या ‘पीपीपी’च्या माध्यमातून हिरेमठ यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कामगिरीची नोंद घाळी दाम्पत्याचा वारसा पुढे नेणाऱ्या संस्थेने घेतला याचा मनस्वी आनंद आहे.

हिरेमठ म्हणाले, चंद्रकांतदादा, ज्येष्ठ बंधू शशीकांत, सर्व कुटुंबीय, शिक्षक आणि ‘अभाविप’ने मला घडवले. पुरस्कारापर्यंत न पोहोचलेल्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारत असून, त्यांनाच तो समर्पित करीत आहे. डॉ. घाळी यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमास प्रा. स्वाती कोरी, प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर, उदय जोशी, हेमंत कोलेकर आदी उपस्थित होते. सहसचिव गजेंद्र बंदी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी मानपत्र वाचले. सचिव ॲड. बाबूराव भोसकी यांनी आभार मानले.

निवडणूक आली म्हणून नव्हे !

स्वातीताईंसारखे अनेक मान्यवर खाली बसले आहेत. निवडणूक आली म्हणून मी असे म्हणत नाही. वडिलांच्या शिकवणुकीप्रमाणे त्या आमच्या विरोधातच राहणार आहेत. ‘त्या तिकडेच राहणार.. आम्ही इकडे राहू’, तरीही त्यांना व्यासपीठावर घ्या, असे मी अध्यक्षांना सांगत होतो. पण, 'निर्णय' लवकर झाला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

‘गडकरीं’मुळेच आमदार झालो !

२००७ मध्ये परममित्र नितीन गडकरी यांनी जोरजबरदस्तीने घोड्यावर बसविल्यामुळेच आपण पहिल्यांदाच थेट विधानपरिषदेची निवडणूक लढवली. जावडेकरांचा अवघ्या ९० मतांनी पराभव झालेल्या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात ९ हजार मतांनी विजयी झालो. त्यावेळी अनेक मित्रांप्रमाणे डॉ. सतीश घाळी यांनीही आपल्याला मोलाची मदत केली, असे मंत्री पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Discussion in the district over Minister Chandrakant Patil comments on Kolhapur District Bank deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.