कोल्हापूर : राजकीय द्वेषातून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला बदनाम केले, पण तीच बँक ६५० कोटींच्या नफ्यात आल्याचा टोला विरोधकांना लगावत, या प्रवृत्तीमुळे सामान्य माणसाचे नुकसान झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या ई लॉबी व नूतन इमारतीचे उद्घाटन बुधवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम करण्याचे काम विकास संस्था, जिल्हा बँक व राज्य सहकारी बँक या त्रिस्तरीय यंत्रणेने केले. पण, राजकारणातून राज्य बँकेला बदनाम करण्याचे काम केल्याने त्याचा फटका सगळ्यांनाच बसला.नोटाबंदी काळातील पाचशे व एक हजाराच्या १०४ कोटींच्या नोटा पुणे, कोल्हापूर व सांगलीसह इतर जिल्हा बँकांत पडून आहेत. याबाबत, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. केंद्रीय मंत्री शाह म्हणजे एक घाव दोन तुकडे ही त्यांच्या कामाची पद्धत असून साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दिलेल्या दरावर आकारण्यात येणारा कर रद्द करण्यासाठी ‘यूपीए’च्या काळात तत्कालीन अर्थमंत्र्यांना भेटलो, पण काही उपयोग झाला नाही. पण, केंद्रीय मंत्री शाह यांनी हा प्रश्न तात्काळ निकालात काढला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.
बदनाम केलेली राज्य सहकारी बँक नफ्यात, अजित पवार यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:43 IST