पावनगडाजवळील जंगलात अज्ञात समाधीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:36 IST2022-04-05T19:34:06+5:302022-04-05T19:36:16+5:30
टीम पावनगड या स्वच्छता करणाऱ्या कार्यकर्त्यांना सापडली समाधी

पावनगडाजवळील जंगलात अज्ञात समाधीचा शोध
नितीन भगवान
पन्हाळा : पावनगडजवळ रेडेघाट जंगलात टीम पावनगड यांच्या कार्यकर्त्यांना अज्ञात समाधी सापडली. या समाधीवर शिवलिंगदेखील आहे. समाधी चार फुट लांब व चार फुट रुंद आकाराची आहे. कोल्हापूर येथील टीम पावनगडचे कार्यकर्ते पावनगडावर रविवारी स्वच्छता करण्यासाठी येत असतात. रविवारी स्वच्छता करत असताना पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यायी रस्त्याकडून पावनगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रेडेघाट जंगलात त्यांना झाडाझुडुपांमध्ये दगडाचा गोलाकार भाग दिसला.
कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शोधमोहीम राबवत झाडेझुडपे काढली. स्वच्छता केली असता, प्राचीन काळातील समाधी सापडली. काळ्या पाषाणात जमिनीच्या वर साधारण चार फुट लांब व चार फुट रुंद चौरस समाधी दिसून आली. समाधीवरील दगडावर शिवलिंगदेखील आढळून आले.
"ही समाधी १६९१ ते १७०१ या दहा वर्षे चाललेल्या वेढ्यातील एखाद्या रजपुत सरदाराची असावी. कारण या वेढ्यात साधारण वीस ते पंचवीस हजार रजपुत सैनिक होते आणि रजपुत सैनिकांना पावनगड राहण्यासाठी दिला होता. रजपुत हे शिवभक्त असल्याने पावनगडावर त्यावेळी बांधलेले शिवमंदिर आहे आणि त्यांच्यातील एखादा प्रमुखाचे निधन झाल्या नंतर समाधी बांधून त्यावर शिवलिंग कोरले जात असे. तर स्रीचे निधन झाल्या नंतर तिच्या समाधीवर पायाचे चिन्ह कोरले जात असे. अशा समाध्या अजून वेखंडवाडी कडून मसाई पठाराकडे जात आसताना पहावयास मिळतात. समाधी बांधण्याचे तंत्र पूर्वीच्या ऋषीमुनींच्या काळी नव्हते. त्यामुळे तत्कालीन मार्कंडेय किंवा पराशर ऋषींच्या काळातील ही समाधी निश्चित नाही," अशी माहिती पुरातत्व इतिहास अभ्यासक सचिन भगवान पाटील यांनी दिली.