मुश्रीफच अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:14 IST2025-07-29T16:14:08+5:302025-07-29T16:14:29+5:30
कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ: ८ सप्टेंबरला वार्षिक सभा होणार

मुश्रीफच अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक ठाम
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उमटले. राजीनाम्याचा विषय सर्वच संचालकांनी फेटाळून लावत मंत्री मुश्रीफ हेच अध्यक्ष राहतील, असा निर्धार केला.
मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात सांगलीतील एका कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घाेषणा केली होती. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले असून बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतही त्यावर चर्चा झाली. राजीनाम्यास सर्वच संचालकांनी विरोध केला. बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबरला घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला उपाध्यक्ष राजू आवळे, आमदार सतेज पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक, संजय घाटगे, राजेश पाटील, ए.वाय. पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, दिलीप लोखंडे व इम्तिहान मुन्शी, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे उपस्थित होते.
मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास यासाठी झाला विरोध..
- गेल्या दहा वर्षात गट-तट विरहित काम केले.
- प्रशासकीय कालावधीतील १०३ कोटीचा संचित तोटा भरुन काढला
- बँकेला २५० कोटीचा ढोबळ नफा
- शेतकऱ्यांबरोबरच महिला बचत गट, व्यावसायिक, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांसह सर्वच घटकांसाठी योजना
शेती तारणावर १० लाख कर्ज
मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज विनातारण द्यावयाचे व दहा लाखापर्यंतचे कर्जाला शेती तारण घ्यावयाची. पगारदार नोकरदारांसाठीची वाहन कर्ज मर्यादा दहा लाखावरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ
जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने बँकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले आहे. सध्या बँकेत दोनशे - अडीचशे कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.