कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक आज, मंगळवारपासून चार दिवस गोव्याला चालले आहेत. तिथे तीन दिवस ‘हॅपीनेस हब प्रशिक्षण’ म्हणजेच मानसिक, भावनिक व शारीरिक आराेग्य सुधारण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते सहभागी होणार आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने युरोप दौरा केल्यानंतर ‘गोकुळ’च्या संचालकांनीही परदेश दौऱ्याची तयारी केली होती. त्यानुसार इंडोनिशिया, सिंगापूर देशांची सहल केली. हा दौरा होऊन तीन महिने होण्याअगोदरच दुसऱ्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. काही संचालकांचा आग्रह केरळसाठी होता, पण चर्चेतून गोवा निश्चित करण्यात आला.चार दिवसांच्या दौऱ्यात ‘हॅपीनेस हब प्रशिक्षण’ घेणार आहेत. या दौऱ्याचा संचालकांचे मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले जाते.
विरोधकच नाहीत, मग विचारायचे कोणी?‘गोकुळ’ची निवडणूक एप्रिल, मे २०२६ मध्ये होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच दुसरा दौरा काढला आहे. त्यात, आता विरोधकच नाहीत, त्यामुळे हरकत घ्यायची तरी कोणी? असा प्रश्न असला तरी संचालकांच्या गोवा दौऱ्याची दूध उत्पादकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.