थेट पाइपलाइन पूर्ण; आता ‘आयटी पार्क’साठी पाठपुरावा करणार - आमदार सतेज पाटील
By भीमगोंड देसाई | Updated: November 11, 2023 17:49 IST2023-11-11T17:47:52+5:302023-11-11T17:49:07+5:30
नऊ वर्षांतील माझे प्रयत्न जनतेला माहीत आहेत, टीकाकारांना उत्तर देणार नाही

थेट पाइपलाइन पूर्ण; आता ‘आयटी पार्क’साठी पाठपुरावा करणार - आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेसाठी नऊ वर्षांत मी किती बैठका घेतल्या, पालकमंत्री असताना किती प्रयत्न केले, हे सर्वांना माहीत आहे. यामुळे माझ्यावर केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही. जनतेची भावना, करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादामुळे ही योजना पूर्ण झाली आहे. आता शहरातील आयटी पार्कसाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी शनिवार पत्रकार परिषदेत दिले.
आमदार पाटील म्हणाले, थेट पाइपलाइन योजना विविध परवानगी, तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होण्यास विलंब लागला. यामुळे अनेकांची केलेली टीका सहन करून सकारात्मक पाठपुरावा करून एक शाश्वत योजना पूर्णत्वास नेल्याचा आनंद आहे. योजनेच्या पाण्याचे वितरण शहरात सर्वत्र होण्यासाठी ११ पाण्याच्या टाक्यांचे कामही गतीने होईल. पाणी सुरू झाल्यानंतर काही ठिकाणची गळती समोर आली. ती काढून योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
पत्रकार परिषदेस आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ऊस दराच्या आंदोलनातून मार्ग निघेल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची ऊस दराची मागणी रास्त आहे. या मागणीसाठी ते ऐन दिवाळीत आंदोलन करणे जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह नाही. मी, हसन मुश्रीफ, विनय कोरे दराच्या मागणीवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.