कोल्हापुरात अवैध गर्भपातात जुन्याच टोळ्या सक्रिय, शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
By उद्धव गोडसे | Updated: March 25, 2026 13:21 IST2026-03-25T13:20:46+5:302026-03-25T13:21:20+5:30
आरोग्य यंत्रणेच्या नियमित तपासणीबद्दल प्रश्न उपस्थित झाले

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : वारंवार कारवाया करुनही जिल्ह्यात अवैध गर्भपाताचे अड्डे राजरोस सुरु आहेत. रोज शेकडो कळ्या गर्भात खुडल्या जात असताना, आरोग्य यंत्रणेच्या नियमित तपासणीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. एजंट आणि डॉक्टरांच्या जुन्याच टोळ्या पुन्हा या गुन्ह्यात सक्रिय होत असल्याने त्यांना कायद्याची भीती नाही, की ठोस कारवाईच होत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटलवर पोलिसांनी सोमवारी (दि. २३) रात्री छापा टाकून गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यापूर्वीच दोनदा गुन्हे दाखल झाल्याने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द झालेला डॉ. युवराज पाटील या कारवाईत रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. हे मशीन त्याने कर्नाटकातून आणल्याची कबुली दिली. औषधे पुरविणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आठ ते दहा एजंट गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी महिलांना त्याच्याकडे पाठवत होते. रोज किमान २५ ते ३० महिलांची तपासणी केल्याच्या नोंदी त्याच्या रुग्ण रजिस्टरमध्ये आहेत. नोंदी नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
वाचा: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमित तपासणीत जिल्ह्यातील बोगस डॉक्टर, अवैध गर्भलिंग निदान, गर्भपाताचे अड्डे याची काहीच माहिती समोर येत नाही. वर्षभरात केलेल्या कारवायांचीही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर केली जात नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुलगा असल्यास २०, मुलगी असल्यास ४० हजार
डॉ. पाटील याच्या हॉस्पिटलमध्येकोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांची नोंद आहे. गर्भलिंग निदानातून मुलगा असल्याचे स्पष्ट होताच तो २० हजार रुपये घेत होता, तर मुलगी असल्यास ४० हजार रुपये घेत होता. गर्भपातासाठी ३० ते ४० हजार रुपये दर होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, क्रांती पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.
डॉक्टर, एजंटचा शोध सुरू
डॉ. पाटील याच्याकडे जिल्ह्यातील किमान १० एजंट काम करीत होते. कारवाई होताच ते गायब झाले आहेत. काही डॉक्टरही गर्भपातासाठी महिलांना बिद्रीला पाठवत होते. डॉ. पाटील याच्या कॉल डिटेल्समधून एजंट आणि डॉक्टरांची नावे समोर येत आहेत. गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन गुन्हे, एक तक्रार
अटकेतील डॉ. पाटील याच्यावर यापूर्वी राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कागल येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही एका तक्रार आली होती.