शेतीमालाच्या दरात वाढ; मग हमाली चार वर्षांपुर्वीची कशी?, हमाली ३० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:52 IST2025-04-09T11:51:39+5:302025-04-09T11:52:13+5:30
कोल्हापूर : शेतीमालाच्या दरात वाढ झाली आहे, त्यातच महागाई गगनाला भिडली असताना, मग हमाली चार वर्षांपूर्वीची कशी? असा सवाल ...

संग्रहित छाया
कोल्हापूर : शेतीमालाच्या दरात वाढ झाली आहे, त्यातच महागाई गगनाला भिडली असताना, मग हमाली चार वर्षांपूर्वीची कशी? असा सवाल करत किमान ३० टक्के वाढीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील हमाल ठाम आहेत, तर इतर समित्यांबरोबरच येथील हमाली असल्याचा दावा व्यापाऱ्यांचा असल्याने आता जिल्हा उपनिबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गूळ, भाजीपाला, कांदा-बटाट्यासह इतर विभागात हमाल कार्यरत आहेत. अडत दुकान व व्यापाऱ्यांकडे हमाल स्वतंत्र आहेत. बाजार समितीत गूळ विभागात साधारणत: पाचशे तर कांदा-बटाटा विभागात ३२५ हमाल कार्यरत आहेत. तीन वर्षांनी हमालीमध्ये वाढ करण्याचा नियम आहे; पण २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून बाजार समितीमध्ये हमालीमध्ये वाढ झालेली नाही. मध्यंतरी हमालांनी संप केल्यानंतर तो अधिकच ताणला होता. शेवट जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कामकाज सुरू झाले होते.
आता, हमाल संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. वाढीसाठी त्यांनी बाजार समितीकडे रीतसर मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात यावर जिल्हा उपनिबंधकांकडे बैठक होऊन चर्चाही झाली आहे. चार वर्षांनंतर वाढ होत असल्याने किमान ३० टक्के वाढ द्यावी, अशी मागणी आहे; पण याबाबत संबंधित घटक तयार नाहीत.
महागाई निर्देशकांनुसारच द्या
टक्केवारी देण्यापेक्षा महागाई निर्देशकांनुसारच हमालीत वाढ करावी, अशी मागणी हमाल संघटनेची आहे.
अशी आहे विभागनिहाय हमाली-
गूळ विभाग
३० किलो रवा - ३.३० रुपये
१० किलो रवा - १.४५ रुपये
५ किलो रवा - ९५ पैसे
कांदा-बटाटा विभाग-
क्विंटलला - १०.४५ रुपये
हमाली वाढीचा प्रस्ताव समितीकडे दिला आहे. सकारात्मक चर्चा सुरू असून योग्य तो निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. - कृष्णात खोत (कांदा-बटाटा हमाल संघटना)