शिरोळ बंधाऱ्यातील जलपर्णी हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:24+5:302021-04-05T04:21:24+5:30
शिरोळ : गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी आणि जलपर्णी हे समीकरणच बनले असल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरू झाला की ...

शिरोळ बंधाऱ्यातील जलपर्णी हटविण्याची मागणी
शिरोळ : गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी आणि जलपर्णी हे समीकरणच बनले असल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरू झाला की नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडतात, शिवाय पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी येते. सध्या शिरोळ बंधाऱ्याची एक बाजू पूर्णपणे जलपर्णीमय बनली असून ही जलपर्णी हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गतवर्षी मार्चनंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे पंचगंगा नदीने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच ऐरणीवर आला आहे. लाखो मासे मृत पावल्यानंतर नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. सध्या नदीपात्रात जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हेच प्रदूषित पाणी सध्या उन्हामुळे पिकांना दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबवावी, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांतून होत आहे.
फोटो - ०४०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील बंधाऱ्यातील एक बाजू पूर्णपणे जलपर्णीने व्यापली आहे.