एस. टी.च्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावायला पैसे, जेवणाची मागणी; वाहतूक अधिकाऱ्यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:13 IST2025-09-20T18:12:56+5:302025-09-20T18:13:14+5:30
काहींनी परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या

एस. टी.च्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावायला पैसे, जेवणाची मागणी; वाहतूक अधिकाऱ्यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र
कोल्हापूर : एस. टी.च्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावण्यासाठी पैसे, जेवण, वस्तूंची मागणी केली जाते, अशी खळबळजनक तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आगाराचा कारभार सुधारावा अन्यथा गांभीर्याने नोंद घ्यावी लागेल, असा इशारा विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी वरिष्ठ आगार व्यवस्थापकांना पत्राव्दारे दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी एसटी कामगार संघटनांनी या प्रकरणाबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यासह काही त्रस्त झालेल्या चालक आणि वाहकांनी विभागीय कार्यालय, पुणे प्रादेशिक विभाग, तर काहींनी परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. आगारात चालक - वाहकांना दररोजचे काम वाटप करणारे वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांच्याबाबतही तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींची आगार पातळीवर चौकशी आणि शहानिशा करून निराकरण गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने याची दखल घेत बोगरे यांनी हे पत्र काढले आहे.
काहींच्या खात्यावर पैसे जमा
मर्जीनुसार ड्युटी लावण्यासाठी आगारातील काही अधिकारी पैसे घेतात, असा आरोप कर्मचारी संघटनांना कडून झाला होता. हे पैसे संबधित अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. संबंधित अधिकाऱ्यांच्या खात्याच्या चौकशीची मागणी चालक - वाहकांनी संघटनांच्या मेळाव्यात केली होती. पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून त्याबाबतच्या सूचना आल्याने विभागीय कार्यालयातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.
काय आहेत तक्रारी
- चालक - वाहकांसोबत नीट बोलत नाहीत
- अरेरावीची भाषा
- पक्षपातीपणा
- गणवेशात नसतात
- कामावर वेळेवर उपस्थित नाहीत
- पैशाची, जेवणाची मागणी
सवलतीची मागणी
- मर्जीतल्या चालक, वाहकांची मागणी
- सेवाज्येष्ठता डावलून ड्युटी द्या
- मुक्कामाच्या एसटीची ड्युटी
- लांब पल्ल्याची सेवा नकोच
कोल्हापूर जिल्ह्यात आगार १२
- एसटी संख्या - ६९०
- चालक - १,२४३
- वाहक - १,३११
- चालक तथा वाहक - ३१८
- एकूण - २,८६०
यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार संबधितांना कामात तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाणार आहे. - संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी