Kolhapur: वाठार तर्फ वडगावची जमीन गावाला परत मिळणार, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत नेत्यांमधील वादामुळे तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:56 IST2025-09-02T13:54:14+5:302025-09-02T13:56:52+5:30
राजूबाबा-अशोकराव माने यांच्यात वाद, रविकिरण इंगवले-धैर्यशिल माने यांच्यात खडाजंगी

Kolhapur: वाठार तर्फ वडगावची जमीन गावाला परत मिळणार, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत नेत्यांमधील वादामुळे तणाव
कोल्हापूर : लोकभावनेचा आदर करून बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेली वाठार तर्फ वडगाव (अंबप, ता. हातकणंगले) गावची ५ एकर जमीन परत देण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
संस्थेचे चेअरमन विजयसिंह माने व गावकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी ९ तारखेला या प्रकरणाबाबत सुनावणी असून, त्या दिवशी किंवा तत्पूर्वी दोन्ही पक्षकारांनी तडजोडीची माहिती लेखी द्यावी. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. तत्पूर्वी लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांमध्ये ताराराणी सभागृहात झालेल्या चर्चेत मोठी वादावादी झाली.
वाठार तर्फ वडगावमधील गटनंतर ११३ ब मधील १० एकर गायरान जमीन असून, त्यापैकी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याविरोधात गावकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनास्त्र पुकारले असून त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, रविकिरण इंगवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
यावेळी सरपंच सचिन कांबळे, संदीप दबडे यांनी तलाठी, सर्कल, तहसीलदार यांनी कशा रीतीने चुकीच्या पद्धतीने जमिनीच्या सात-बारा पत्रकावर, डायऱ्यांवर फेरफार नोंदी केल्या आहेत. ग्रामपंचायतीची परवानगी नसताना, अतिक्रमण यादीत नाव असलेल्या संस्थेच्या नावे भाडेकरार केला गेला, जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करत खोटी कागदपत्रे सादर केल्याचे सांगितले. त्या जमिनीवर गावाचा हक्क असून, ती गावाला परत मिळावी, अशी मागणी केली.
खासदार धैर्यशील माने यांनी मात्र यात मध्यस्थी करत शिक्षण प्रसारक मंडळाचे विजयसिंह माने यांना गावाला विश्वासात न घेता झालेल्या या निर्णयामुळे लोकभावना तीव्र आहेत. गावालाच हा निर्णय मान्य नसेल तर लोकभावनेचा आदर करत समन्वयातून तोडगा काढावा व संस्थेने स्वत:हून गावाला जागा परत द्यावी, असे आवाहन केले. त्यांना अशोकराव माने यांनीही दुजोरा दिला.
यावर विजयसिंह माने यांनी आपण लोकप्रतिनिधी व प्रशासनापेक्षा आमची भावना वेगळी नाही फक्त आमचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेने शासनाकडे कायदेशीररीत्या रीतसर जागेची मागणी केली होती. मात्र, लोकभावनेचा आणि लोकप्रतिनिधींच्या भावनेचा आदर करून आम्ही जमीन गावाला परत द्यायला तयार आहेत. - विजयसिंह माने, चेअरमन, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ
हजारावर ग्रामस्थ.. परिसरात तणाव
हजारावर ग्रामस्थ आल्याने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीऐवजी ताराराणी सभागृहात ग्रामस्थांची खासदार धैर्यशिल माने, आमदार अशोकराव माने, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, रविकिरण इंगवले यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली. ग्रामस्थ लोकप्रतिनिधींचेही ऐकायला तयार नसल्याने मोठा तणाव होता.
राजूबाबा-अशोकराव माने यांच्यात वाद
यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांनी अशोकराव माने यांना बापू मराठा भवनची जागा तर तुम्ही घेतली, आता ही जागा घेऊ नका, असा टोमणा मारला. यावर माने यांनी तो मुद्दा इथे काढू नका, ती जागा रीतसर दिली असल्याचे सांगितले.
रविकिरण इंगवले-धैर्यशिल माने यांच्यात खडाजंगी
रविकिरण इंगवले ग्रामस्थांना जमीन तुमच्या हक्काची आहे, लोकप्रतिनिधी तुमच्यावर उपकार करत नाहीत, रडून, भीक मागून काही मिळवू नका, लढून मिळवा, असे सांगितले. त्यावर खासदार माने यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, असे सुनावले.