कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासासाठी डीपीआर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:08 IST2025-03-26T13:07:31+5:302025-03-26T13:08:15+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या ४२ गावांच्या संतुलित विकासाकरिता सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासासाठी डीपीआर
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या ४२ गावांच्या संतुलित विकासाकरिता सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार होती; परंतु ते बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे मंगळवारी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. उपमुख्यमंत्री पुन्हा गैरहजर राहिल्याने शेवटी अधिकाऱ्यांच्या पातळीवर ही बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. बैठकीत अवर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे सचिव गोविंदराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची वाट पाहून शेवटी अधिकारी स्तरावर बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करायचा आणि त्यासाठी कशा पद्धतीने निधी देता येईल यावर पर्याय द्यायचे ठरले. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांत गावांचा विकास झालेला नाही तसेच प्राधिकरणाला विकास निधी म्हणून काहीही देण्यात आलेले नाही, याकडे आमदार नरके यांनी लक्ष वेधले.