शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव
By संदीप आडनाईक | Updated: December 8, 2023 19:12 IST2023-12-08T19:11:53+5:302023-12-08T19:12:23+5:30
नागरी कृती समितीची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव
कोल्हापूर : शिरोली ते उचगांव उड्डाण पूलादरम्यान पिलर उभारुनच रस्त्याची उंची वाढवावी तसेच पूर्वीच्या रस्त्यासाठी घातलेला भराव काढून पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा करुन दयावा, अशी मागणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदारकर यांच्याकडे शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. यासंदर्भात म्हणणे ऐकून घेउन या प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करुन नियमावलीनुसार पुर्नअंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत पाठवण्याचे आश्वासन पंदारकर यांनी आंदोलकांना दिले.
दरम्यान, केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी भराव न टाकता पिलर उभारुनच उंची वाढविण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्राधिकरणाला दिले आहे. त्याची पुर्तता करुन या महामार्ग विस्तारीकरण कामाचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणीही कृती समितीने केली आहे. उजळाईवाडी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रकल्प संचालक पंदरकर यांची शुक्रवारी कृती समितीने भेट घेउन चर्चा केली.
कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण काम सुरु आहे. शिरोली ते पंचगंगा पूल आणि तावडे हॉटेल ते उचगांव रेल्वे उड्डाण पूल या अडीच हजार मीटर मार्गावर भराव टाकून महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी भराव टाकून उंची वाढवून बांधलेल्या महामार्गाच्या भरावाच्या अडथळ्यामुळे महापूरात शहर व छोटी छोटी गावे पाण्यात बुडतात. आणखी भराव टाकल्यास पूराचा फटका बसून कोल्हापूर कायमपणे पाण्यात जाईल. महामार्गाचा आराखडा न करता घाईगडबडीने काम सुरु केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कामावर जनता लक्ष ठेवणार आहे. चुकीचे कामकाज झाल्यास रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करण्याचा इशाराही नागरी कृती समितीने दिला आहे.
या आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, उजळाईवाडी येथील राजू माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनय कदम, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, राजाभाऊ मालेकर, तानाजी चव्हाण. उजळाईवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विलास कुंभार, प्रकाश सुर्यवंशी, नायकू बागणे, रंजीत पवार, महादेव जाधव, अमृत शिंदे, इंजिनिअर महेश जाधव, कादरभाई मलबारी, रफिक मुल्ला आदी सहभागी झाले होते.