The death of a turtle in the Rinkala ditch: - Accident due to a turtle in swimming | रंकाळा खणीत पोहायला गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू -: पोहताना दमछाक झाल्याने दुर्घटना
रंकाळा खणीत पोहायला गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू -: पोहताना दमछाक झाल्याने दुर्घटना

ठळक मुद्देमोहिते कॉलनीवर शोककळा

कोल्हापूर : रंकाळा खणीवर गुरुवारी सकाळी पोहायला गेलेल्या समृद्धी अमित सूर्यवंशी (वय १०, रा. माधवप्रेम अपार्टमेंट, मोहिते मळा, देवकर पाणंद) हिचा पोहताना दमछाक झाल्याने नाका, तोंडात पाणी जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. लाघवी स्वभावाच्या समृद्धीच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्तहोत आहे.

समृद्धी शाळेला सुट्टी असल्याने गेल्या १५ दिवसांपासून खणीवर नातेवाइकांबरोबर पोहण्यासाठी जात होती. आज, गुरुवारीही ती नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास पोहायला पाण्यात उतरली. तिने अंगाभोवती टायरची इनर घातली होती. पोहत थोडे अंतर गेल्यावर तिच्या नाक आणि तोंडात पाणी गेले; त्यामुळे तिचा जीव गुदमरला. हे लक्षात येताच तत्काळ तिला आजुबाजूला पोाहणाऱ्यांनी पाण्याबाहेर आणून उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत्युनंतर तिचे नेत्रदान करण्यात आले.

समृद्धी नुकतीच चौथी पास झाली होती. आजच ती पोहून झाल्यानंतर वडिलांबरोबर पाचवीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी जाणार होती. तशी ती चर्चाही सकाळी वडिलांबरोबर झाली होती. तिचे वडील एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये अधिकारी आहेत. आपल्या मुलगीचा असा दुर्देवी मृत्यू झाल्यांने आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.


अहो, माझ्या समूला पाणी पाजा हो...! आईच्या आर्त हाकेने सीपीआर हळहळले
शिरगाव : ‘समू ऊठ ना बाळा..., माझ्या बाळा ऊठ की..., अहो माझ्या समूला पाणी पाजा हो... तिला तहान लागली असेल..., समू तुझ्यासाठी मी काय खाऊ करू... रात्री मला कुठली गोष्ट सांगितलीस..., ...ऊठ समू, ऊठ की..’ अशा भाबड्या विनवण्या करीत निपचित पडलेल्या आपल्या नऊ वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह पाहून सीपीआरमध्ये आईचा आक्रोश सुरू होता. तिच्या आर्त हाका ऐकून रोज डझनभर मृतदेह पाहणारे, नातेवाइकांच्या किंकाळ्या ऐकणारे सीपीआरही हळहळले. सीपीआरमधील एका कॉटवर तिचा निपचित पडलेला देह पाहून येणारे-जाणारेदेखील सुन्न होत होते. समृद्धीच्या मृत्यूची बातमी समजेल तसे सूर्यवंशी कुटुंबाचे मित्रपरिवार, नातेवाईक सीपीआरमध्ये येत होते. या कुटुंबाला आधार देत होते. समृद्धीचा २३ मे रोजी वाढदिवस होता; पण नियतीला ते मान्य नव्हते. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे.


Web Title:  The death of a turtle in the Rinkala ditch: - Accident due to a turtle in swimming
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.