ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 22:06 IST2025-06-13T22:06:10+5:302025-06-13T22:06:47+5:30

उजळाईवाडीतील घटना: अमान भालदार हा राधाबाई शिंदे स्कूल येथे सहावीत शिकत होता.

Death of Aman Bhaldar who was swept away by the water of the stream: Confusion in the area | ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

- मोहन सातपुते 

लोकमत न्यूज नेटवर्क 
उचगाव: सरनोबतवाडीत गुरुवार (दि.१२ जून) रोजी झालेल्या ढगफुटी पावसामुळे सरनोबतवाडीच्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या ११ वर्षीय अमान जमाल भालदार  रा.कोर्ट कॉलनी उजळाईवाडी या मुलाचा शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापनच्या शोधकार्य पथकाला मृतदेह सापडला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने आईवडिलांनी धायमोखलून फोडलेल्या हंबरड्याने मृतदेह बघणाऱ्या गर्दीतील माणसांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.

उजळाईवाडी  (धोंडे नगर कोर्ट कॉलनी ) येथील जमाल भालदार यांचा मोठा मुलगा अमान जमाल भालदार हा सायकल वरून मणेर मळ्यातील खाजगी क्लासला जात होता. अचानक ढगफुटी पाऊस झाला. सरनोबतवाडी- मणेर मळा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पाण्याच्या प्रवाहासोबत अमान भालदार हा सायकलवरून जात असताना वाहून गेला. त्यानंतर त्यांच्या शोधकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व गांधीनगर पोलिसांना बोलावण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू केलेले शोध कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पण रात्र झाल्याने शुक्रवारी सकाळी शोध कार्य सुरु करण्यात आले. स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन पथकाला सरनोबत वाडी येथील ओढ्याच्या काठावर झाडाच्या झुडपात मृतदेह सापडला.

 मृतदेह पाहून भालदार कुटुंबीय, नातेवाईक यांनी हंबरडा फोडलेल्या पाहून अनेकाना अश्रू अनावर झाले.  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे शवविचेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजता बागल चौक येथील कबरस्थान येथे त्याचे दफन करण्यात आले.

अमान भालदार हा राधाबाई शिंदे स्कूल येथे सहावीत शिकत होता. जमाल भालदार यांचे उजळाईवाडी विमानतळ रोडवरील सरस्वती मंगल कार्यालय जवळ अमान इंटरप्राइजेस हे खाद्य पदार्थाचे दुकान आहे.या घटनेनंतर भालदार कुटुंबीय यांच्या घरी आप्तेवाईक, मित्र मंडळी,यांची रीघ लागली होती. त्याच्या पश्चात आई- वडील, लहान बहीण यांच्यासह मोठा परिवार आहे. 

अमान हा खेळकर व विनोदी स्वभावाचा  होता. संवेदनशील वृत्तीचा आणि तितकाच सहज सेवा करणारा होता. नेहमी हसत मुख असलेल्या मुलाच्या जाण्याने आईने फोडलेला हंबरडा हृदय हेलावून टाकणारा होता.

Web Title: Death of Aman Bhaldar who was swept away by the water of the stream: Confusion in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.