मूकबधीराने मूकबधीराला घातला ७० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:55+5:302021-04-05T04:20:55+5:30
कोल्हापूर : सहा महिन्यात दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे ७० हजार रुपयांचे साडेसतरा ग्रॅम सोन्याचे गंथन घेऊन फसवणूक ...

मूकबधीराने मूकबधीराला घातला ७० हजारांचा गंडा
कोल्हापूर : सहा महिन्यात दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे ७० हजार रुपयांचे साडेसतरा ग्रॅम सोन्याचे गंथन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात एका मूकबधीर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश वसंत पाटील (वय ३१, रा. दत्तनारायण कॉप्लेक्स, राजोपाध्ये नगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश जनार्दन जाधव (वय ४२, रा. २४, ई वॉर्ड, दत्त मंदिरनजीक, जाधववाडी, कोल्हापूर) हे मूकबधीर असून, त्यांचा मूकबधीर मित्र आकाश पाटील याच्याशी त्यांची ओळखीतून मैत्री झाली होती. संशयित आकाशने सहा महिन्यात दुप्पट सोने देतो, अशा भूलथापा मारुन जादा सोन्याचे आमिष दाखवून योगेश जाधव यांच्याकडून साडेसतरा ग्रॅम वजनाचे सुमारे ७० हजार रुपयांचे सोन्याचे गंथन घेतले. ही घटना डिसेंबर २०२०मध्ये स्टेशन रोडवर घडली. त्यानंतर त्या रकमेचा अपहार करुन संशयित आकाश पाटील याने फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.