विहीरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात पोलिसांसह ग्रामस्थांत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:18 IST2023-05-28T13:17:42+5:302023-05-28T13:18:00+5:30
बहिरेश्वर ता करवीर येथील नामदेव सणगर वय ६५ या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला.

विहीरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात पोलिसांसह ग्रामस्थांत संभ्रम
कसबा बीड : बहिरेश्वर ता करवीर येथील नामदेव सणगर वय ६५ या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार,मयत नामदेव सणगर हे शनिवारी रात्री ११वाजता घरातून शेताला पाणी पाजून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले.त्यांचे पुतणे नागेश सणगर ही शेताला पाणी पाजण्यासाठी रात्री शेतावर आले होते.विहीरीवर मोटार सुरू करत असतानाच मयत नामदेव सणगर हे पाण्यावर तरंगत असलेले पुतणे नागेश सणगर यांच्या निदर्शनास आले, त्यावेळी त्यांनी तात्काळ त्यांचा मुलगा मनोहर सणगर याला कळविले.
त्यानंतर गावकामगार पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार यांनीही माहिती घेऊन करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली. सकाळी पहाटे करवीर पोलिस आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय व डाव्या हात साडीच्या दोरीच्या सहाय्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
पुढील तपास करणेसाठी पोलिस प्रशासनाकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते,पण श्वान त्यांच्या घरी जाऊन घुटमळले ..सदरचा पंचनामा गावकामगार पोलिस पाटील व पंच यांचे समवेत करून मृतदेह शवविच्छेदन करणेकामी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल. बघ्यांची गर्दी झाली होती.पोलिस वरिष्ठ अधिकारी अॅडीशनल एस.पी जयश्री देसाई, उपाधिक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक निवास पोवार करत आहेत.