उजळाईवाडीत सराईत गुंडाची दिवसाढवळ्या दहशत; बेकरीसह दुचाकीची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 22:51 IST2025-09-18T22:49:25+5:302025-09-18T22:51:06+5:30
घटनेने उजळाईवाडी कॉलनी परिसरात घबराट

उजळाईवाडीत सराईत गुंडाची दिवसाढवळ्या दहशत; बेकरीसह दुचाकीची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव:उजळाईवाडी (ता. करवीर) येथे गुरुवार दि.१८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सराईत ५ ते ७ गुंडांनी हातात कोयता, तलवार, एडका, लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण करीत कॉलनीतील दुचाकीची तोडफोड केली. तसेच एका रस्त्यावरील बेकरी मध्येही घुसून
हाणामारी केली. त्याच बरोबर महिलाना अर्वाच्य भाषेत दमदाटी देत नंग्या तलवारी नाचवत गुंडांनी कॉलनीतील रहिवाश्श्याची झोप उडवून दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या अनेक वर्षांपासून उजळाईवाडीत सराईत गुंडांचा वावर होता. तत्कालीन सपोनि सुशांत चव्हाण यांनी येथील गावकऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी मोडीत काढत येथील गुंडांना मोका लावला होता. त्यामुळे उजळाईवाडी शांत होती. अलिकडे मोक्यातील गुंड यांची सुटका झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासह अन्य गुंडांनी उजळाईवाडीत येऊन दहशत निर्माण केली आहे.
गुरुवारी झालेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांचा मनात धडकी भरावी असेच कृत गुंडाकडून झाले. येथील कॉलनीत एका व्यक्तीशी असलेल्या वादाचे रूपांतर कॉलनीतील रहिवाश्यांनी लावलेल्या दुचाकीची तोडफोड करण्या पर्यंत गेली. या प्रकारामुळे सर्वच हतबल झाले. ग्रामस्थानी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलिसांची व्हॅन आल्यानंतर गुंडांनी मणेर मळया कडील मठाकडे धूम ठोकली होती. रात्री उशिरा पर्यंत या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली नव्हती.