Kolhapur News: लिंगनूर, दुगूनवाडीत भरदिवसा हत्ती; मका, ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:17 IST2023-04-27T14:16:52+5:302023-04-27T14:17:09+5:30

हत्तीने भर दिवसा गावात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.

Daytime elephants in Lingnoor, Dugunwadi Kolhapur district; Damage to maize, sugarcane, banana, coconut crops | Kolhapur News: लिंगनूर, दुगूनवाडीत भरदिवसा हत्ती; मका, ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान 

Kolhapur News: लिंगनूर, दुगूनवाडीत भरदिवसा हत्ती; मका, ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान 

नेसरी : लिंगनूर तर्फ नेसरी, दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे भर दिवसा टस्कर हत्तीने गावात प्रवेश केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुगूनवाडी भागात मंगळवारी (२५) रात्रीपासून चारापाण्याच्या शोधात आलेल्या हत्तीने भर दिवसा गावात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.

दुगूनवाडीतील महादेव मंदिराजवळ महिलेला हत्तीचे दर्शन झाले. तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. हत्ती गावात आल्याचे समजताच नागरिकांची हत्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री मुंगूरवाडीनजीकच्या ओढ्यातून लिंगनूर तर्फ नेसरी या गावात प्रवेश केला होता.

दैनंदिन कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांची काहीवेळ भंबेरी उडाली. हत्ती शांतपणे गावातील रस्त्यावरून जात होता. काही हुल्लडबाजांनी ओरडाओरडा करून हत्तीला बिथरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सकाळी ११ वाजेनंतर हत्ती लिंगनूरहून हेब्बाळ-जलद्याळ, मांगनूर तर्फ सावतवाडी शिवारात गेला. काही हुल्लडबाजांमुळे हत्ती बिथरण्याची शक्यता असून, वनविभागाने तातडीने या हत्तीला सुरक्षितस्थळी पाठवावे, अशी मागणी होत आहे. अर्जुनवाडी, नेसरी, शिप्पूर तर्फ नेसरी, बतकणंगले, हेब्बाळ-जळद्याल मार्गे लिंगनूर, दुगूनवाडी, मुंगूरवाडी परिसरात हा हत्ती गेल्याचा अंदाज आहे.

फेब्रुवारीपासून अर्जुनवाडी, तळेवाडी डोंगर भागत त्याचा वावर आहे. चार दिवसांपूर्वी हत्ती रात्री बाराच्या सुमारास नेसरीकरांना दिसला होता. हत्तीने ऊस, नारळ, केळी पिकांसह पाण्याच्या टाकींचे नुकसान केले आहे. सध्या काजू हंगाम सुरू असून, शेतकरी काजू गोळा करत आहे. हत्ती आल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. हत्ती बिथरू नये यासाठी नागरिकांनी हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन वनपाल भंडारी यांनी केले आहे.

गव्यांचाही त्रास सुरूच मंगळवारी रात्री बटकणगंलेचे प्रगतिशील शेतकरी प्रमोद जाधव यांच्या शेतातील मटकर शेरी नावाच्या शेतातील काढणीला आलेला मका गव्यांनी फस्त केला. सुमारे एक एकर क्षेत्रातील मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच हत्तीनेही शिवारात मोर्चा वळविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Web Title: Daytime elephants in Lingnoor, Dugunwadi Kolhapur district; Damage to maize, sugarcane, banana, coconut crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.