कोल्हापूर सर्किट बेंचच्या नूतनीकरणाचे दिवस-रात्र काम; तीन कोर्ट रूमची उभारणी, तीन न्यायाधीशांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:29 IST2025-08-09T19:28:10+5:302025-08-09T19:29:42+5:30
न्यायालयाच्या ताब्यात सोमवारी देण्याची तयारी

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सीपीआर चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. दिवस-रात्र राबून हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. सर्व कामे अंतिम टप्यात आहेत. येत्या सोमवारी ११ ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करून न्यायालयाच्या ताब्यात इमारत देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कामाच्या ठिकाणी भेट देवून सर्व कामे वेळेत गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला १८ ऑगस्टला सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होत आहे. सीपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील सर्किट बेंचसाठी आवश्यक सेवा, सुविधा निर्माण केल्या जात आहेत. अत्याधुनिक असे तीन कोर्ट रूम आणि अँन्टी चेंबर तयार केले जात आहेत. बार रूमही बनवले जात आहे. न्यायाधीश, वकील, पक्षकारांना बसण्यासाठी खुर्च्या आणून ठेवल्या आहेत. वातानुकूलीत यंत्रणा बसवली जात आहे.
न्यायालयाच्या ताब्यात इमारत आल्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील मुंबई उच्च न्यायालयातील खटले वर्ग करण्यात येणार आहेत. खटल्याच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन सुनावणीसाठीची व्यवस्था केली जात आहे. वारंवार वरिष्ठ अधिकारी इमारतीच्या कामांची पाहणी करून आढावा घेत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, ॲड. इंद्रजीत चव्हाण, टी. एस. पाडेकर, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते.
तीन न्यायाधीशांची नियुक्ती, १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तीन न्यायाधीशांची शुक्रवारी विशेष नियुक्ती झाली. १७ ऑगस्टला बेंचचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, अजून उद्घाटन कार्यक्रमाचे स्थळ निश्चित झालेले नाही. सर्वाेच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमासाठी स्थळ शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सीपीआर चौकात जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासाठीच्या सेवा, सुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. एकाबाजूला इमारतीची डागडुजी, यंत्रणा उभारणी आणि त्याचवेळेला न्यायाधीश, सरकारी वकील, अनुषंगिक कर्मचारी नियुक्तीचा सपाटाही सुरू आहे. एखाद्या कुटुंबात लग्न समारंभ असताना जशी घाई सुरू असते, तशीच घाई सर्किट बेंचच्या तयारीसाठी सुरू आहे. कोल्हापूरच्या सामान्य जनतेतही त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
कोण असतील न्यायाधीश
- पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे (क्रमांक ६)
- अहमदनगर येथील २४ वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आर. एस. धडके.
- चंद्रपूर जिल्हयातील सावली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. तोंडचिरे.
सरकारी वकीलही झाले फायनल
शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने मुंबई न्यायालयातील अपील शाखेतील अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे, विकास माळी, संजय रायरीकर, तेजस कापरे, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वीरा वामन शिंदे, श्रीराम चौधरी, श्रीकांत यादव, आनंद शाळगावकर, नितीन पाटील, पंकज देवकर, अविनाश नाईक, अश्विनी टाकळकर, प्रियांका राणे, शुभांगी देशमुख यांनी पुढील आदेशापर्यंत कोल्हापूर सर्किट बेंच येथील कार्यभार सांभाळावा, असा आदेश उपविधी सल्लागार विलास खांडबहाले यांनी दिला आहे. येत्या आठवड्यात बेंचसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती होणार आहे.