महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST2021-04-02T04:23:56+5:302021-04-02T04:23:56+5:30
कसबा बावडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक तारखेचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. मात्र, निवडणूक लांबणीवर पडत ...

महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली
कसबा बावडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक तारखेचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. मात्र, निवडणूक लांबणीवर पडत असल्याने निवडणुकीआधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांची चांगलीच घालमेल वाढली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये होईल अशी शक्यता होती. प्रारूप याद्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला. त्यामुळे प्रशासनाची ही लगीनघाई पाहून इच्छुकांनीही जोरदार तयारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून इच्छुकांनी 'होऊ दे खर्च' म्हणत हात सैल सोडला होता.
राजकीय पक्षांसह इच्छुकांनी तर युद्धपातळीवर निवडणुकीची तयारी सुरू केली. इच्छुकांनी सुरुवातीच्या टप्प्यात तर कार्यकर्त्यांवर भरमसाट खर्च करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च आपोआप वाढण्यास सुरुवात झाली. नागरिकांशी संपर्क, वाढदिवस, घरगुती कार्यक्रमांना इच्छुकांनी हजेरी लावायला सुरुवात केली. काही ठिकाणी हळदी-कुंकूचे कार्यक्रमही पार पडले. काही प्रभागात लहान-मोठ्या विविध स्पर्धांची बक्षिसेही इच्छुकांनी स्वखुशीने दिली. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तारीख अद्यापही जाहीर केली नसल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. निवडणूक लांबली असली तरी इच्छुकांचा खर्च मात्र वाढतच चालल्याचे चित्र आहे.