फिल्मफेअरपेक्षाही दानवे पुरस्काराचे मोल अधिक : महेश कोठारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:26 IST2021-03-01T21:24:54+5:302021-03-01T21:26:22+5:30
Mahesh Kothare Kolhapur- माझ्या तरुणपणात ज्यांचे बोट धरून चित्रपटसृष्टीत आलो, त्यांच्याच कुटुंबीयांकडून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअरहून या पुरस्काराचे मोल अधिक असल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात सोमवारी नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कुटुंबीयांतर्फे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना राजदर्शन दानवे यांच्या हस्ते कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून प्रा. सुजय पाटील, आशिष भागवत, जयश्री दानवे उपस्थित होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : माझ्या तरुणपणात ज्यांचे बोट धरून चित्रपटसृष्टीत आलो, त्यांच्याच कुटुंबीयांकडून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअरहून या पुरस्काराचे मोल अधिक असल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केली.
दानवे कुटुंबीयांतर्फे सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात कोठारे यांना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते.
कोठारे म्हणाले, मला १९७५ ला तरुणपणात अभिनेता म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचा प्रीत तुझी माझी हा पहिला चित्रपट मिळाला. त्याच चित्रपटात जयशंकर दानवे हेही होते. त्यांच्याकडून अभिनयातील बारकावे शिकायला मिळाले. विशेष म्हणजे दिग्दर्शक पेंढारकर यांच्याकडे एफटीआयची मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीची लायब्ररी ताब्यात होती. त्यात दानवे यांनी खलनायक म्हणून अभिनय केलेल्या चित्रपट पाहता आले.
दोनच दिवसांपूर्वी मला फिल्मफेअरचा एक्सलन्स अवॉर्डही मिळाला आहे. त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मला महत्त्वाचा आहे. कारण करवीरनगरीत व भालजी बाबांच्या जयप्रभा स्टुडिओत मी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्या चित्रपटांवर कोल्हापूरकरांनी भरभरून प्रेम केले. हे ऋण माझ्यावर आहेत.
माझ्या तारुण्यातील पहिला चित्रपट आणि त्याच चित्रपटात जयशंकर दानवे यांची कारर्किदीतील शेवटची भूमिका होती. त्यामुळे हा पुरस्कार मला मिळणे माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण म्हटले तरी वावगे ठरू नये.
स्वागत व प्रास्ताविक जयश्री दानवे यांनी केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुुपमा चव्हाण व सन्मानपत्र वाचन जाई भागवत यांनी केले. यावेळी आशिष भागवत, सुधीर पेटकर, प्रा. सुजय पाटील उपस्थित होते.