जयसिंगपूर / गणेशवाडी - अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरुन ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. याविरोधात राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने रविवारी उदगाव-अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी संतप्त आंदोलकांनी धरण तुमचे मरण आमचे, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला.
यावेळी आंदोलनस्थळी येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस् लावून मार्ग बंद केल्याने आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पोलिसांना धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची वाहने सोडल्याने तणाव निवळला. तीन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनानंतर अलमट्टीच्या उंचीबाबत पाटबंधारे विभागाच्यावतीने बुधवारी (दि.२१) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठकीचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी आमदार राहूल आवाडे, अरुण लाड, जयवंत आसगावकर, माजी आमदार संजय घाटगे, उल्हास पाटील, राजूबाबा आवळे, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. आंदोलनात रजनीताई मगदूम, राजवर्धन निंबाळकर, अमरसिंह पाटील, धनाजीराव जगदाळे, वैभव उगळे, सतीश मलमे, पी.एम.पाटील, अभिजित जगदाळे, अनंत धनवडे, विश्वास बालीघाटे, दिपक पाटील, विक्रांत पाटील, दादेपाशा पटेल यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त, शेतकरी सहभागी झाले होते.