‘बाबां’च्या खांद्यावरून ‘दादां’चा निशाणा

By admin | Published: April 25, 2016 10:11 PM2016-04-25T22:11:29+5:302016-04-26T00:44:25+5:30

संजय घाटगे गटाला उभारी : हसन मुश्रीफ यांना रोखण्यासाठी घाटगेंना बळ देण्याची व्यूहरचना

'Dadan' target on 'Baba' shoulder | ‘बाबां’च्या खांद्यावरून ‘दादां’चा निशाणा

‘बाबां’च्या खांद्यावरून ‘दादां’चा निशाणा

Next

दत्ता पाटील -- म्हाकवे कागल तालुक्यात तीन सहकारी आणि एक खासगी साखर
कारखाना कार्यरत असतानाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना साखर कारखान्यासाठी परवाना देण्याचे सूतोवाच केले आहे.
यामागे आमदार हसन मुश्रीफ
यांना त्यांच्याच तालुक्यात रोखून त्यांना शह देण्याचाच उद्देश असल्याचे बोलले जात आहे. परंतु, काहीही असले तरी यामुळे तब्बल १७ वर्षे सत्तेबाहेर असतानाही गटाचे अस्तित्व अबाधित राखणाऱ्या माजी आमदार संजय घाटगे गटाला उभारी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कारभारावरून सध्या चंद्रकांत पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांचा जिल्हा बँकेसह महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ यासह गडहिंग्लज, आजरा, बिद्री कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे त्यांची ही घोडदौड रोखण्यासाठी त्यांना कागल मतदारसंघातूनच
सुरुवात करणे गरजेचे आहे.
संजय घाटगे हे सध्या शिवसेनेत आहेत. तरीही ते कोणत्या पक्षात आहेत? त्यांचे कोणाशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत? याचा विचार न करता चंद्रकांतदादांनी केवळ मुश्रीफ यांना रोखण्यासाठी संजय घाटगे यांना बळ देण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखल्याचेही बोलले जात आहे.
अन्नपूर्णा पाणी योजनेच्या माध्यमातून पिकविलेला लाखभर
टन ऊस गाळप करण्यासाठी
संजय घाटगे यांना कारखाना काढून देण्याची घोषणा करताना
पाटील म्हणाले की, प्रसंगी सहकार कायद्यात तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु, संजय घाटगे यांना कारखाना देणारच. यामुळे अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर असणाऱ्या संजय घाटगे गटात नवचैतन्य पसरले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभेचे उमेदवार असणाऱ्या संजय घाटगे
यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत
भव्य मेळाव्याचे आयोजन केले; तर आमदार हसन मुश्रीफ यांनीही तालुक्याच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक फार मोठ्या चुरशीने होणार, हे निश्चित.

सहकारामुळेच अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजना होऊ शकली. व्हनाळी, सावर्डे परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस वेळेत तुटला जावा, तसेच या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी कारखान्याची गरज आहे. आम्हाला सत्ता, संपत्तीपेक्षा जनता हीच सर्वस्व वाटते. त्यामुळे त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य समजतो.
- संजय घाटगे, माजी आमदार
त्याचप्रमाणे साके, व्हनाळी, गोरंबे, केनवडे, सावर्डे, सावतवाडी, पिराचीवाडी या डोंगरमाथ्यावर पाण्याची सोय करून हक्काचा ऊस निर्माण करून आता साखर कारखाना निर्माण करण्याचे प्रयत्न घाटगे यांनी सुरू केले आहेत.

Web Title: 'Dadan' target on 'Baba' shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.