डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीवर होणार रिप्लेसमेंट थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:56+5:302021-04-25T04:22:56+5:30
अत्यंत गरीब कुटुंबातील दीड वर्षीय बालिका 'पॉम्पेज डिसीस' या दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाल्याचे निदान झाले आणि महिन्याला लाखो रुपयांच्या ...

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीवर होणार रिप्लेसमेंट थेरपी
अत्यंत गरीब कुटुंबातील दीड वर्षीय बालिका 'पॉम्पेज डिसीस' या दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाल्याचे निदान झाले आणि महिन्याला लाखो रुपयांच्या महागड्या उपचारांच्या कल्पनेनेच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध पातळ्यांवर शर्तीचे प्रयत्न करत या मुलीला 'सॅनोफी जेनोझाइम अँड टकेडा इंटरनॅशनल' कंपनीच्या मदतीने हे उपचार मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या बालिकेला गुरुवारी एन्झायम रिप्लेसमेंट थेरेपीचा पहिला डोस हॉस्पिटलमध्ये देण्यात आला आहे.
आर्वी कांबळे ही १ वर्ष ७ महिन्यांची बालिका 'पॉम्पेज डिसीस' या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. हा उपचार उपलब्ध असणारा ग्लाइकोजेन स्टोरेज अनुवंशिक आजार आहे. ४ महिन्यांपूर्वी ही बालिका तपसणीसाठी दाखल झाली होती. तिला कफ व श्वासोच्छवास घेण्यात अडचण येत होती. अधिक तपासणीनंतर 'पॉम्पेज डिसीस' चे निदान झाले. त्यानंतर नवजात शिशु विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता पाटील व बालरोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे यांनी विविध स्वयंसेवी संस्था, औषध कंपन्या यांच्याकडे संपर्क साधून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या बालिकेला दर पंधरा दिवसांनी ही थेरपी द्यावी लागणार असून, तीन वर्षे ती सुरू राहणार आहे. एकावेळचा खर्च हा सुमारे अडीच लाख रुपये इतका असून, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल 'सॅनोफी' कंपनीच्या सहकार्याने हे उपचार मोफत पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.