कोल्हापूर : जगातील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा समावेश व्हावा इतक्या उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचे ध्येय बाळगले असल्याचे डॉ. संजय डी. पाटील यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. एकसष्टीनिमित्त त्यांचा शानदार सोहळ्यात सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा पटच उलगडून सांगितला. आई-वडिलांचे आशीर्वाद, त्यांनी दिलेली शिकवण, कुटुंबीयांचे पाठबळ, मुलांनीही पुढे चालवलेला वारसा आणि समाजाकडून मिळालेले प्रेम हे सांगताना ते सद्गतीत झाले.डॉ. पाटील म्हणाले, माझे आयुष्य म्हणजे सबकुछ दादा असेच आहे. त्यांनी माझ्यावर वयाच्या विसाव्या वर्षी विश्वास टाकला म्हणूनच मी चांगले काम करू शकलो. जे काम हाती घेतले ते तडीस नेण्याचा कायमच प्रयत्न केला. वडिलांनी नम्रतेची शिकवण दिली होती, तिला कधीच बट्टा लागू दिला नाही. छोट्या-छोट्या लोकांचीही या वाटचालीत मोठी मदत झाली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.प्रत्येक वर्षाला नवीन प्रकल्प हाती घेण्याची माझी कायमच धडपड असते. आजच सयाजीमध्ये भूमिपूजन करून आलो. तिथे २३ मजली इमारत उभी करत आहोत. आमची तिन्हीही विद्यापीठे नॅक मानांकनात पुढे आहेत, परंतु तेवढ्यावर माझे समाधान नाही. ती जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांच्या यादीत का येऊ नयेत, असा विचार माझ्या मनात आहे. त्यामुळे ते माझे यापुढील महत्त्वाचे टार्गेट आहे.पी. डी. पाटील म्हणाले, संजय पाटील हे माझ्यापेक्षा वयाने १३ वर्षांनी लहान आहेत. त्यांनी आणि मी एकाचवर्षी १९८४ ला या क्षेत्रात पाऊल ठेवले, परंतु त्यांची झेप, प्रगतीचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी कोणत्याच क्षेत्रात कधी हातचे राखून काही केले नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने आई-वडिलांचे नाव मोठे केले.आमदार सतेज पाटील म्हणाले, दादांनी भैय्यांवर जरूर विश्वास टाकला, तरी गेल्या ४० वर्षांत संस्थांचा जो पसारा उभा केला, त्यामागे संजय भैय्या यांचेच निर्विवाद कष्ट आहेत. तळसंदेची जमीन घेतली, तेव्हा तिथे काहीही होणार नाही, असे अनेकांनी दादांना सांगितले, परंतु तिथे नंदनवन फुलवण्याचे काम भैय्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी कोल्हापुरातील पाच हजार कुटुंबांना जगण्याचा आधार दिला आहे.
बंटी माझे हार्ट माझी एकसष्टी साजरी करण्यात सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला, याचा मला खूपच आनंद झाला असल्याचे सांगून डॉ. संजय पाटील म्हणाले, सतेज पाटील खूप कष्ट करतो. त्याला आजपर्यंत जे काही मिळाले त्यासाठी त्याला फारच संघर्ष करावा लागला. बंटी माझे हार्ट आहे, असे म्हणताच त्यांना गदगदून आले. मोठ्या भावाचे हे प्रेम व्यासपीठावर सतेज पाटील व सारे कुटुंबीय पाहत होते.