डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:08+5:302021-07-02T04:18:08+5:30

कोल्हापूर : विज्ञानावर आधारीत शेती विकासाचा पाया रचणाऱ्या शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. ...

D. Y. Patil Group will create a generation that will revolutionize agriculture | डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल

डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल

Next

कोल्हापूर : विज्ञानावर आधारीत शेती विकासाचा पाया रचणाऱ्या शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. पाटील ग्रुपचे खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले, याचा सार्थ अभिमान आहे, हे विद्यापीठ शेती क्षेत्रात क्रांती घडवणारी नवीन पिढी तयार करेल, असा विश्वास माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील होते. डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम व प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, खासदार संजय मंडलिक हे मान्यवर सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेेळी विद्यापीठाचे उद्घाटन, शैक्षणिक संकूल इमारत कोनशिला, मुक्त गाेठा प्रकल्प, मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले. मान्यवरांचा सत्कार गायवासरू स्मृतिचिन्ह देऊन झाला.

राज्यातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच कोल्हापूरच्या मातीत विद्यापीठाचा शुभारंभ होण्याचा योग जुळून आला ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करून शरद पवार म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत बदल अनुभवायचा असल्यास शेतीचे अर्थकारण सुधारण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५८ टक्के लोकांची क्रयशक्ती सुधारली नाही तर देश संकटातून बाहेर येणार नाही, हे वास्तव आहे. चीन, बॅंकॉक, नेदरलॅण्डसारख्या शेतीक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांशी समन्वय साधा, काही अडचण आली तर मला सांगा मी मदत करेन, अशी ग्वाही देखील दिली. राज्यातील राहूरी, परभणी, अकोला, दापोली येथील चारही सरकारी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. आता एकत्रित विद्यापीठ ही संकल्पना घेऊन डी. वाय. पाटील ग्रुपने यात पाऊल ठेवले आहे, हे स्तुत्य आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा.

प्रास्ताविकात संजय डी. पाटील यांनी ‌‌‌वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. आभार आमदार ऋतुराज पाटील यांनी मानले.

चौकट

ए ग्रेडचे विद्यापीठ करू...

कृषी विद्यापीठ ही डी. वाय. ग्रुपची सातवी शाखा आहे. इतर संस्थांप्रमाणेच १६ हजार विद्यार्थी संख्या, नॅकचे ए ग्रेड मानांकन आणि आयसीआयची मान्यता मिळवणे हे आपले येथू्न पुढे ध्येय असणार आहे आणि त्यात नक्कीच यश देखील येईल असा विश्वास संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

संशोधनावर भर द्या

विद्यापीठात संशोधनावर भर देण्यास सांगताना पवार म्हणाले, उत्पादन वाढीसाठी बियाण्यांत नवनवीन संशोधन काळाची गरज आहे. अमेरिका, ब्राझीलसारखी देशात जीएम वाणावर एकाबाजूला चळवळी होतात, तर दुसरीकडे त्याच बियाण्यांद्वारे उत्पादन वाढवून जगभर निर्यातही करतात. भारतात देखील हेच धोरण हवे. देशात संशोधन करणाऱ्या ८० संस्थांमध्ये पाच हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे संंशोधन बांधापर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.

पवार आणि पंतप्रधान

शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाला पंतप्रधानपदी बसलेले मला पाहायचे आहे. ते स्वप्न पूर्ण होऊ दे अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे, असा पुनरुच्चार डी. वाय. पाटील यांनी केला.

चौकट

मान्यवर काय म्हणाले...

जलसंपदा मंत्री जयंत पाटील : हे विद्यापीठ नव्या संशोधनला चालना देईल असा मला विश्वास वाटतो.

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत : कृषी पीएचडीच्या जागा वाढवण्यासाठीचा प्रस्ताव पाठवू.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ : कोरोनाकाळात शेती क्षेत्रानेच तारल्याने संशोधन वाढवण्यावर भर द्यावा.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात : शेती विकासाला बळ देणारे काम विद्यापीठात होईल.

(फोटो पाठवत आहे)

Web Title: D. Y. Patil Group will create a generation that will revolutionize agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.