अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार, दूधगंगा नदीवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:00 IST2020-10-06T16:42:09+5:302020-10-06T17:00:45+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दुपारी तीनच्या सुमारास घडली. अशोक साताप्पा कोळी (वय ५०, रा. कोळी मळा, कोगनोळी ता. निपाणी ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार, दूधगंगा नदीवरील घटना
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार दुपारी तीनच्या सुमारास घडली. अशोक साताप्पा कोळी (वय ५०, रा. कोळी मळा, कोगनोळी ता. निपाणी ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर कागलहुन कोगनोळीकडे येणाऱ्या अशोक साताप्पा कोळी यांच्या सायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोळी हे सुमारे पंधरा फूट अंतरावर जाऊन पडले. त्यांच्या पाठीला व डोक्याला जबर मार लागला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बि. एस. तळवार, कोगनोळी पोलीस आऊट पोस्टचे अमर चंदनशिव, पी.एम. घस्ती, एस. बी. खोत यांनी भेट दिली. घटना कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कागल पोलिसांना पाचारण करण्यात आले.
कागलचे पोलिस निरिक्षक दतात्रय नाळे, हवालदार इंद्रजीत शिंदे व कॉन्स्टेबल सुरज कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कागल येथील शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.