कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत अद्याप संभ्रम; नेमक्या होणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:55 IST2025-11-10T18:55:14+5:302025-11-10T18:55:31+5:30
उच्च न्यायालयात २७ नोव्हेंबर रोजी आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत अंतिम सुनावणी

कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत अद्याप संभ्रम; नेमक्या होणार कधी?
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार, याची ग्रामीण कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता आहे. कारण एकीकडे पंधरवड्यात ही घोषणा होईल, असे सांगण्यात येत असताना दुसरीकडे उच्च न्यायालयात २७ नोव्हेंबर रोजी आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत अंतिम सुनावणी आहे. त्यामुळे या विषयीचा संभ्रम अजूनही संपलेला नाही.
जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समित्यांच्या १३६ जागांसाठी पावणे चार वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. आधीच प्रभाग रचनेवरून न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्याने राज्यभरातील त्यांचे निकाल लागण्यात काही कालावधी गेला. सहा महिन्यांच्या एकूण हालचालीनुसार या निवडणुका पहिल्यांदा होणार होत्या. परंतु, राज्यभरातील अतिवृष्टी, त्यामुळे झालेले नुकसान, अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर न पोहोचलेली नुकसानभरपाई यामुळे या निवडणुकांचा कार्यक्रम मागे गेला आणि त्याआधी नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक जाहीर झाली.
२०१७ च्या निवडणुकीमध्ये गोळाबेरीज करून भाजपासह मित्रपक्षांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित ठेवत शौमिका महाडिक यांना भाजपाच्या पहिल्या महिला अध्यक्ष केले होते. मात्र, अडीच वर्षांनंतर परिस्थिती बदलली आणि काॅंग्रेस, राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता हस्तगत केली. या संपूर्ण कालावधीत राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या असून, आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशा लढत होणार असून, काही ठिकाणी महायुतीमध्येच संघर्ष पाहायला मिळणार आहे.
- जिल्हा परिषद जागा ६८
- पंचायत समिती जागा १३६