उत्तरे देताना पोलिसांची दमछाक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:16 IST2020-05-04T18:14:52+5:302020-05-04T18:16:19+5:30
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकावर सोमवार सकाळपासून जिल्ह्याबाहेर जाणे-येण्यासाठी नोंदणी, दुकाने सुरू करण्याबाबतच्या शंकांची विचारणा करणाऱ्या लोकांची गर्दी झाली. ...

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी लोकांनी जिल्ह्याबाहेर जाणे व येण्याच्या नोंदणीसंदर्भात माहिती घेण्यासाठी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकावर सोमवार सकाळपासून जिल्ह्याबाहेर जाणे-येण्यासाठी नोंदणी, दुकाने सुरू करण्याबाबतच्या शंकांची विचारणा करणाऱ्या लोकांची गर्दी झाली. त्यांना उत्तरे देऊन परत पाठविताना पोलिसांची चांगलीच दमछाक सुरू होती. दुपारपर्यंत हे चित्र राहिले.
जिल्ह्याबाहेरून कोल्हापुरात येण्यासाठी व कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आॅनलाईन नोंदणी सुरू आहे. अनेकजणांना याबद्दल माहिती नसल्याने सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घेण्यासाठी येत आहेत. सोमवारी सकाळपासून या नोंदणीची माहिती घेण्यासाठी तसेच लॉकडाऊनमधून कोणत्या दुकानांना परवानगी मिळाली आहे, किंवा नाही याबाबत विचारणा करण्यासाठी लोक येत होते. यामुळे फाटकावर मोठी गर्दी दिसत होती. अखेर पोलिसांनी या फाटकाचे दरवाजे बंद करून घेतले.
कार्यालयातील अधिकाऱ्यांची वाहने आत व बाहेर सोडण्यावेळीच ते उघडले जात होते. फाटकासमोर गर्दी केलेल्या लोकांना उत्तरे देताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. परजिल्ह्यात जाण्यासाठी व येण्यासाठी नोंदणी आॅनलाईन सुरू असून या ठिकाणी नोंदणी होत नसल्याचे संबंधितांना सांगण्यात आले. तरीही लोक येतच राहिले. दुपारपर्यंत हे चित्र दिसत होते.