साधू-संतांमुळेच सशक्त समाज निर्मिती: भगतसिंह कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 16:13 IST2020-02-26T16:09:44+5:302020-02-26T16:13:00+5:30
कोल्हापुरातील भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सगळे राजशिष्ट्याचार बाजूला ठेवून आचार्यांप्रती आदर व्यक्त करत खाली बसले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरातील भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सगळे राजशिष्ट्याचार बाजूला ठेवून आचार्यांप्रती आदर व्यक्त करत पदयात्रेत सहभागी होत महाराजांसोबत काही पावलं चालत गेले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : भारतातील साधू संतांनी शिकवलेल्या जीवनमुल्यांमुळे सशक्त समाजाची निर्मिती होत असून ही या देशाची विशेषता आहे. त्यांच्या वाणीने आत्मा शुद्ध होतो. व्यावहारिक आयुष्य जगताना सूर्याच्या किरणांप्रमाणे त्यांच्या साधनेचा प्रकाश आपल्यावर पडावा यासाठी प्रत्येकाने काही काळ या ऋषीमुनींच्या सानिध्यात घालवावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.
सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने या दिमाखदार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आॅल इंडिया जैन मायनोरिटीचे अध्यक्ष ललित गांधी, भाजपचे विजयराज पैरानिक उपस्थित होते.
महापौर निलोफर आजरेकर यांनी आचार्य आल्याने आमची शाहू नगरी पावन झाल्याची भावना व्यक्त करत त्यांचे स्वागत केले. मुनी कुमारश्रवण यांनी पदयात्रेचा उद्देश सांगितला. यावेळी विजयराज पैराणिक, मनोगत व्यक्त केले. उत्तमचंद पगारिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.