Kolhapur: ८० फुटांवर पाळणा अडकला, १८ जणांचा जीव टांगणीला; सर्वांना सुखरूप खाली आणण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:26 IST2025-10-25T14:26:23+5:302025-10-25T14:26:51+5:30
कागल येथील उरुसातील घटना

Kolhapur: ८० फुटांवर पाळणा अडकला, १८ जणांचा जीव टांगणीला; सर्वांना सुखरूप खाली आणण्यात यश
कागल : येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जाॅइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकल्याने या पाळण्यात बसलेले अठरा जण ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले. 
रात्री ०८:३० वाजता हे पाळण्यात बसले होते. रात्री ११:३० वाजेपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका- एका व्यक्तीस खाली घेण्यास सुरुवात केली. रात्री १२:३० वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण कागल, कणेरी मठ, गोकुळ शिरगाव येथील होते.
तब्बल चार तास हा थरार चालला. सर्व जण खाली येण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. आपण इतक्या उंचीवर येऊन अडकलो आहोत. या भीतीने चिंताग्रस्त होऊन हे लोक एकमेकांना धीर देत होते, तर खाली नातेवाईक त्यांना हातवारे करून धीर देण्यासाठी धडपडत होते. मोबाइल फोनवरील संपर्क यासाठी मोठा आधार ठरला. यामुळे कोणता गोंधळ उडाला नाही. सर्वांनी संयम बाळगला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीने रात्री ११:०० वाजेच्या सुमारास एका- एका व्यक्तीस खाली उतरविण्यात सुरुवात करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. उरुसानिमित्त दरवर्षी येथे लहान- मोठ्या आकारांतील पाळणे येतात. गेल्या दोन वर्षांपासून हा जाॅइंट व्हील नावाचा पाळणा येत आहे. यामध्ये वर्तुळाकारात समोर तोंड करून मांडलेल्या खुर्चीवर लोकांना बसतात. हे वर्तुळाकार चक्र लोखंडी अँगल वरून सरकत वर ऐंशी फुटांवर जाते व तेथे स्थिर होऊन फिरते, अशी याची रचना आहे. सायंकाळी ०७:०० वाजता हा पाळणा सुरू झाला. रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले. पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केला; पण यश आले नाही. 
शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचे बचाव पथक बोलवून यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. याप्रसंगी उरूस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीण काळबर, सौरभ पाटील, दीपक मगर, अमित पिष्टे, विवेक लोटे आदींनीही या कामात मदत केली.