‘सीपीआर’प्रश्नी २० मे नंतर बैठक

By admin | Published: May 13, 2014 05:17 PM2014-05-13T17:17:53+5:302014-05-13T17:21:09+5:30

जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन : एक कोटीत रुग्णालय चालणार कसे? कृती समितीचा सवाल

'CPR' question after 20th meeting | ‘सीपीआर’प्रश्नी २० मे नंतर बैठक

‘सीपीआर’प्रश्नी २० मे नंतर बैठक

Next

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) पूर्ण क्षमतेने व सुरळीतपणे चालविण्यासाठी किमान सहा कोटी रुपये निधी अपेक्षित आहे. शासनाकडून मात्र दोन कोटी रुपयेच मिळतात. त्यातील एक कोटी रुपये हे सर्पदंशावरील लसीकरिता खर्च होतात. त्यामुळे उरलेल्या एक कोटी रुपयांमध्ये हे रुग्णालय चालवायचे कसे? असा सवाल आज (सोमवार) ‘सीपीआर बचाव कृती समिती’ने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना केला. यावर ‘सीपीआर’प्रश्नी जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत २० मे नंतर बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. ‘सीपीआर बचाव कृती समिती’चे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन चर्चा केली. मुळीक म्हणाले, ‘सीपीआर’ला घरघर लागली आहे. रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामध्ये औषधे नाहीत, साप किंवा कुत्रे चावल्यानंतर द्यावी लागणारी लस या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. रुग्णांना सर्रास औषधे बाहेरून आणायला सांगितले जाते. त्यामुळे रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. सिटी स्कॅनसह अनेक वैद्यकीय उपकरणे बंद आहेत. अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर बंद आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांसाठी व औषधांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून भरीव निधीची तरतूद करावी. तसेच काही निधी रुग्णालयाकडे वर्ग करावा. ‘सीपीआर’शी संबंधित सर्व शासकीय अधिकार्‍यांची व्यापक बैठक घ्यावी. बाबा इंदुलकर म्हणाले, महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी रेबीजची लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असताना २००८ पासून एकही रेबीजची लस महापालिकेकडून देण्यात आली नाही. यामुळे येथील रुग्णांचा भार हा ‘सीपीआर’वर पडत आहे. जिल्हाधिकारी माने म्हणाले, ‘सीपीआर’प्रश्नी २० मे नंतर संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल. तत्पूर्वी, २० मे रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी)च्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा होईल. शिष्टमंडळात बबनराव रानगे, कृष्णात पोवार, दिलीप देसाई, बाबासाहेब देवकर, दिलीप पवार, भगवान काटे, समीर नदाफ, मारुती भागोजी, बाळासाहेब भोसले, किशोर घाटगे, विकास जाधव, रूपा वायदंडे, संभाजीराव जगदाळे, उदय पोवार, अ‍ॅड. शिवाजीराव हिलगे, प्रसाद जाधव, चंद्रकांत बराले, महादेव पाटील, अवधूत पाटील, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, रमेश भोजकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 'CPR' question after 20th meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.