सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याने गेळवडेतील तरुणास हालवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:10 IST2018-11-12T18:09:16+5:302018-11-12T18:10:30+5:30
गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे राजकीय वादातून झालेल्या मारामारीत हात तुटलेले सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी (दि. ११) दाखल केले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्लास्टिक सर्जन नसल्यामुळे लाड यांच्यावर सर्जरी करण्यात आली नसल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उल्हास मिसाळ यांनी सोमवारी सांगितले.

सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याने गेळवडेतील तरुणास हालवले
कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे राजकीय वादातून झालेल्या मारामारीत हात तुटलेले सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी (दि. ११) दाखल केले आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्लास्टिक सर्जन नसल्यामुळे लाड यांच्यावर सर्जरी करण्यात आली नसल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उल्हास मिसाळ यांनी सोमवारी सांगितले.
गेळवडे येथे रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वादातून शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्ष या दोन गटांत मारामारी झाली. यामध्ये आठ जखमी झाले. त्यापैकी पाचजणांवर सीपीआरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. या मारामारीत सीताराम लाड यांचा हात तुटला आहे. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णालयात प्लास्टिक सर्जन नसल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी दुपारी नेण्यात आले.
सीपीआरमध्ये पूर्वी बाहेरून प्लास्टिक सर्जन आणून त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. सध्या सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याचे डॉ. मिसाळ यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सीपीआरमध्ये दुपारी आमदार सत्यजित पाटील यांनी जखमींची वॉर्डमध्ये जाऊन विचारपूस केली.
अवघड शस्त्रक्रिया...
एखाद्या व्यक्तीचा हात तुटला तर साधारणत: चार ते सहा तासांत तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. कारण प्रत्येक नस जोडायची असते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व अवघड असते. जर वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही, तर त्याचा काही उपयोग होत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले.