झाकलेले टोलबूथ उघडले
By Admin | Updated: May 31, 2014 01:17 IST2014-05-31T00:46:59+5:302014-05-31T01:17:18+5:30
‘आयआरबी’च्या हालचाली वाढल्या : सुरक्षेची खात्री झाल्यावरच करणार वसुली

झाकलेले टोलबूथ उघडले
कोल्हापूर : ‘आयआरबी’ने आज, शुक्रवारी सायंकाळी झाकलेले टोलबूथ उघडून स्वच्छ करण्यास सुरुवात केली. यानंतर शहरभर टोलवसुली सुरू झाल्याची अफवा पसरली. याची खात्री करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनीही तातडीने टोलनाक्यांकडे धाव घेतली. मात्र टोलवसुली सुरु नसल्याची खात्री झाल्यानंतर ते माघारी फिरले. आज दिवसभर टोल सुरू करण्यासाठी आयआरबीची, तर विरोधासाठी आंदोलकांच्या हालचालींनी वेग घेतला होता. दरम्यान, पुरेशा पोलीस बंदोबस्तासह टोलवसुलीसाठी पूर्णपणे सुरक्षित वातावरण निर्माण झाल्याची खात्री झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याचे ‘आयआरबी’च्या सूत्रांनी आज ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. शहरातील टोल वसुली सुरू करण्यासाठी सोमवारपासून (दि. २६) हालचालींनी वेग घेतला होता. पोलीस बंदोबस्तानंतर ४८ तासांत टोलवसुली सुरू करणार असल्याचे पत्र आयआरबी कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले. टोलनाक्यांवर पोलिसांना विश्रांतीसाठी शेड, शौचालय तसेच जेवण आणि नाष्टा, आदींची सोय करण्याची मागणी जिल्हा पोलीसप्रमुखांनी ‘आयआरबी’कडे केली. आयआरबीने पोलिसांच्या मागण्यांकडे कायद्याच्या चाकोरीतून न बघता मागणीप्रमाणे बुधवारपासून पोलीस बंदोबस्तात सुविधा पुरविण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, महापौर, नगरसेवकांसह ३२ जणांना मागील आंदोलनात टोल नाक्यांच्या तोडफोडप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी तीन लाख रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या. त्यामुळे गुरुवारी महापौरांनी आयआरबीने टोलनाक्यावर पोलिसांसाठी उभारलेले पत्र्याचे शेड हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशाप्रमाणे टोलनाक्यांवर अशा बांधकामासाठी महापालिका किंवा इतर शासनाच्या विभागाच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे पत्र्याचे शेड काढणे महापालिकेस तूर्तास तरी शक्य झाले नाही. पत्र्याचे शेड काढण्यावरून आज, शुक्रवारी झालेल्या महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. (प्रतिनिधी)