VIDEO: ...अन् भरसभेत नगरसेवकानं घेतली पप्पी; संपूर्ण सभागृह अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:25 IST2020-01-30T16:45:47+5:302020-01-30T17:25:55+5:30
संपूर्ण महापालिकेत 'गोड' घटनेची चर्चा

VIDEO: ...अन् भरसभेत नगरसेवकानं घेतली पप्पी; संपूर्ण सभागृह अवाक्
कोल्हापूर: अनेकदा महापालिकेच्या सभा गदारोळ, गोंधळामुळे गाजतात. कधी कधी तर लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची, हाणामारीदेखील होते. मात्र आज कोल्हापूर महानगरपालिकेची सभा वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली. महापालिका सभागृहात कामकाज सुरू असताना एका नगसेवकानं त्याच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी घेतली. विरोधी गटातल्या नगरसेवकाचं सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकावरचं हे 'प्रेम' पाहून पालिकेचं संपूर्ण सभागृह आश्चर्यचकीत झालं.
...अन् कोल्हापूर महापालिकेच्या भरसभेत नगरसेवकानं घेतली पप्पी; संपूर्ण सभागृह अवाक् pic.twitter.com/a1ehjVre64
— Lokmat (@MiLOKMAT) January 30, 2020
आज महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यांच्या बाजूला काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. यावेळी भोपळे आणि देशमुख यांच्यात संवाद सुरू होता. यानंतर अतिशय आनंदी झालेल्या भोपळेंनी सभागृहाचं कामकाज सुरू असताना देशमुखांच्या गालावर पप्पी दिली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण सभागृहात खसखस पिकली. भोपळे आणि देशमुख यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, ज्यामुळे हा 'गोड' प्रसंग घडला, याची जोरदार चर्चा सभागृहात सुरू होती. कोल्हापूर महापालिकेत आज ही घटना अतिशय गाजली.